For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

भारतीय महिलांची आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची वनडे लढत

06:58 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांची आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची वनडे लढत

मायदेशातील पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान, हरमनप्रीत कौरच्या फलंदाजीतील फॉर्मवर राहील लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय महिला संघ आज मंगळवारी येथे तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात प्रबळ ऑस्ट्रेलियाशी लढणार असून यावेळी घरच्या मैदानांवरील नऊ सामन्यांची पराभवाची मालिका संपविण्याचे त्यांचे ध्येय राहील. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या फलंदाजीतील फॉर्मवर विशेष लक्ष राहील.

Advertisement

कौरने मायदेशातील प्रदीर्घ मोसमात कसोटींतील दोन ऐतिहासिक विजयासह संघाचे चांगले नेतृत्व केले आहे. परंतु या कालावधीत तिला फलंदाजीत संघर्ष देखील करावा लागलेला आहे. तिने या मोसमातील आठ डावांत केवळ तीन वेळा दुहेरी आकड्यांत धावा केल्या आहेत आणि गेल्या महिन्यात इंग्लंडविऊद्धच्या एकमेव कसोटीत काढलेल्या 49 धावा ही तिची सर्वांत मोठी खेळी राहिलेली आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या एकमेव कसोटीतील ऐतिहासिक विजयात कौर भारताच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाली आणि तिला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची गरज भासली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये तिची धावसंख्या 9 आणि 5 अशी राहिलेली आहे.

Advertisement

एकमेव कसोटीत भारताने घरच्या भूमीवरील अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर फायदा करून घेतला असला, तर मागील दोन सामन्यांमधून एकदिवसीय क्रिकेटमधील भारतीय संघाची कमजोरी पुन्हा समोर आली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 8 बाद 282 धावा अशी सर्वोच्च धावसंख्या उभारूनही सहा गड्यांनी त्यांना पराभूत व्हावे लागले. कौरच्या संघाने दुसऱ्या सामन्यात तब्बल सात झेल सोडले, परिणामस्वरुप ऑस्ट्रेलियाचा तीन धावांनी विजय झाला.

त्याचवेळी, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील रिचा घोषची प्रभावी कामगिरी (113 चेंडूंत 13 चौकारांसह 96 धावा) आणि जेमिमा रॉड्रिग्सचे सातत्य (82 आणि 44 धावा) यांनी भारताच्या फलंदाजीला मोलाचा आधार दिला. घोषला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्याचा प्रयोग चांगलाच कामी आला आहे आणि वरच्या फळीतील तिचा आक्रमक खेळ फलंदाजीला विलक्षण धार मिळवून देऊ लागला आहे. अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा यांच्यावरही दबाव असेल. कारण त्यांना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जवळपास एका चेंडूमागे एक धाव  असे समीकरण असतानाही भारताला विजय मिळवून देता आला नाही.

भारताने किमान सात संधी गमावल्यानंतर ‘कॅचेस विन मॅचेस’ ही जुनी म्हण पुन्हा समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सामन्यानंतर कबूल केले की, कौरचा संघ अद्यापही प्रगतिपथावर आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात तीन धावांनी केलेल्या पराभवामुळे मायदेशातील ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या त्यांच्या खराब कामगिरीत आणखी भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाला गेल्या 16 वर्षांत म्हणजे फेब्रुवारी, 2007 पासून 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांना एकदाही हरवता आलेले नाही.

दरम्यान, पूजा वस्त्रकारशी टक्कर झाल्यामुळे मागील सामन्याचा दुसरे सत्र गमावलेली स्नेह राणा अंतिम वनडेसाठी उपलब्ध असेल, याला मुजुमदार यांनी दुजोरा दिलेला आहे. भारत 2025 मध्ये महिलांच्या 50 षटकांच्या सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असून त्यादृष्टीने संघाचा मुख्य भाग आधीच निश्चित झाला आहे. मात्र सर्व विभागांमध्ये आणि विशेषत: क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलिया शेवटच्या सामन्यातही चांगले प्रदर्शन घडविण्यास उत्सुक असेल. त्यातही कर्णधार अॅलिसा हिलीकडून मोठ्या खेळीची प्रतीक्षा असेल. हिलीने सातत्याने दुहेरी आकड्यांमध्ये धावसंख्या नोंदविलेली असली, तरी तिला मोठा डाव उभारता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाला दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतके फटकावलेल्या फोबी लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांच्याकडूनही पुन्हा तशाच धडाकेबाज फलंदाजीची अपेक्षा असेल.

संघ-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, हरलीन देओल.

ऑस्ट्रेलिया : अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, हीदर ग्रॅहम, अॅश्ले गार्डनर, किम गर्थ, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.

सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.

Advertisement
×

.