शस्त्रास्त्रांचा मोठा साठा काश्मीरमध्ये जप्त
शोपियानमधील चकमकीनंतर सुरक्षा दलाला मोठे यश
वृत्तसंस्था/ श्रीनगर
भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतरही सुरक्षा दलांकडून कारवाईचे सत्र सुरूच आहे. जम्मू काश्मीरमधील शोपियान जिह्यातील केलरमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये एके-47 बंदूक, हँडग्रेनेड, हजारो गोळ्यांसह अनेक प्रकारच्या बंदुका समाविष्ट आहेत. मंगळवारच्या चकमकीनंतर दुसऱ्याच दिवशी शोपियानमध्ये त्याच परिसरात सुरक्षा दलांकडून व्यापक शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये मोठा शस्त्रास्त्रसाठा सापडल्याने सुरक्षा दलाला मोठे यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
शोपियानमध्ये मंगळवार, 13 मे रोजी केलरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे (एलईटी) तीन दहशतवादी मारले गेले. शोपियान जिह्यातील केलरच्या शुक्रू वन परिसरात मंगळवारी दुपारी 4.30 वाजता ही चकमक संपली. या चकमकीला ‘ऑपरेशन केलर’ असे नाव देण्यात आले होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर शाहिद अहमद कुट्टीचाही समावेश होता. तसेच अदनान शफी आणि पहलगाम येथील रहिवासी अहसान अहमद शेख यांनाही कंठस्नान घालण्यात आले होते.