For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळी अधिक तेजोमयसाठी आकाशकंदील माध्यम

03:46 PM Oct 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिवाळी अधिक तेजोमयसाठी आकाशकंदील माध्यम
Advertisement

विक्रेत्यांनी दुकानांसमोर टांगले रंगीबेरंगी आकाशकंदील : आकाशदीपांची पूजा करण्याची पद्धत प्राचीन काळापासूनची

Advertisement

बेळगाव : दिवाळी अधिक तेजोमय करण्यासाठी आकाशकंदील हे माध्यम मोठे समर्पक आहे. शहरात विक्रेत्यांनी दुकानांसमोर आकाशकंदील टांगले असून, रंगीबेरंगी आकाश कंदिलांच्यामधून पाझरणारा प्रकाश सायंकाळच्यावेळी प्रसन्न असे वातावरण निर्माण करतो आहे. दिवाळी म्हणजे आकाशकंदील हे समीकरण पक्के आहे. कोणत्याही आनंदाच्या किंवा शुभ घटनेप्रसंगी दिवे लावून प्रकाश निर्माण करणे ही तर आपली पूर्वांपार परंपरा. कृषी संस्कृतीच्या कालखंडात मातीचे दिवे पाहायला मिळत. त्यानंतर तेलाचे दिवे, पणत्या, समई, निरांजन असा प्रवास आकाशकंदिलांपर्यंत येऊन थांबला आहे. दिवाळीला आकाशकंदील लावून प्रकाशाच्या या सणाचे स्वागत करण्याची कल्पनाच मुळात मोठी अनुपम आहे.

आकाशदीपांची पूजा करण्याची पद्धत फार प्राचीन  आकाशकंदिलांची वाटचाल कशी झाली? हे पाहणे सुद्धा रंजक आहे. तज्ञांच्या मते  कंदील हा शब्द भारतीय भाषेतला नाही. लॅटीन भाषेतील कँडेलावरून तो आला असावा असे मानले जाते. इंग्रजी भाषेत त्याला लॅण्टर्न असा शब्द आहे. कालोघात त्याचा लालटेन  असा शब्द झाला. कागदाचा शोध चीनमध्ये लागला आणि कागदापासून वेगवेगळ्या कलात्मक वस्तू तयार करण्याची संकल्पनासुद्धा चीनची असली तरी  आकाशदीपांची पूजा करण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये आहे. जेव्हा आजच्यासारख्या विजेची सोय नव्हती. तेव्हा प्रकाश निर्माण करून वाटाड्याला वाट दाखविण्यासाठी आकाशकंदील तयार केले जात. आठ पाकळ्यांच्या कमळासारख्या आकाराच्या आकाश दिव्यांच्या प्रत्येक पाकळीवर आणि मध्ये एक असे नऊ तेलाचे दिवे ठेवले जात.

Advertisement

मुख्य म्हणजे झाडांच्या मोठ्या पानांपासून तयार केलेल्या या कलात्मक कृतीला कमळ दिवा असे म्हटले जात होते. त्याच्यातून पुढे आजच्या आकाशकंदिलाची संकल्पना पुढे आली. आकाशकंदिलांना जितके धार्मिक महत्त्व तितकेच कलात्मकही आकाशकंदिलांना जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच कलात्मकही महत्त्व आहे. कागद, कार्डबोर्ड, बांबूच्या काड्या वापरून वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील पाहायला मिळतात. आज बाजारात फेरफटका मारला असता. 300 हून अधिक प्रकारचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. थर्मोकोलचे, कार्डबोर्डचे, लवचिक अशा प्लास्टिकचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. याशिवाय कागदी आकाशकंदील आहेतच.

मोत्यांपासून आकाशकंदील तयार 

कलात्मकतेची हौस असलेल्या महिलांनी अलीकडे मोत्यांपासून आकाशकंदील तयार केले आहेत. ते कायमस्वरुपी वापरता येणे शक्य आहे. मात्र दरवर्षी वेगळेपण हवे, असा आग्रह धरणारे ग्राहक कागदी आकाशकंदीलच खरेदी करण्यावर भर देत आहेत. चांदणी, षटकोन, लंबकाच्या आकारात, तुळशी कट्यासारखे दिसणारे असे वेगवेगळे आकाशकंदील पाहायला मिळतात. काही दुकानांमध्ये दिवाळीमध्ये आकाशकंदील व एरवी लॅम्पशेड म्हणून वापर करता येण्याजोगे आकाशकंदीलही बाजारपेठेत आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळापासूनच आकाशकंदील बनविण्यास प्रारंभ झाला आहे. ग्राहकांनी खरेदीस सुरुवात केली आहे. आणि आपल्या प्रकाशाने परिसर उजळवून टाकणारे आकाशकंदील खरेदीचा आनंद द्विगुणित करत आहेत.

Advertisement
Tags :

.