For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकेचा 602 धावांचा डोंगर, न्यूझीलंड 2 बाद 22

06:55 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
लंकेचा 602 धावांचा डोंगर  न्यूझीलंड 2 बाद 22
Advertisement

कमिंदू मेंडीस, कुशल मेंडीस, चंडीमल यांची शतके

Advertisement

वृत्तसंस्था / गॅले

येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान लंकेने आपला पहिला डाव 5 बाद 602 धावांवर घोषित केला. त्यानंतर मात्र न्यूझीलंडची पहिल्या डावात स्थिती 2 बाद 22 अशी केविलवाणी झाली. लंकेच्या डावामध्ये कमिंदू मेंडीस, दिनेश चंडीमल आणि कुशल मेंडीस यांनी दमदार शतके झळकविली.

Advertisement

लंकेने या मालिकेतील पहिली कसोटी 63 धावांनी जिंकून न्यूझीलंडवर यापूर्वीच आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीत लंकेच्या फलंदाजांनी 600 धावांचा टप्पा ओलांडताना न्यूझीलंडच्या गोलदंजाची धुलाई केली. लंकेने 3 बाद 306 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांनी आपला पहिला डाव 183.4 षटकात 5 बाद 602 धावांवर घोषित केला. दिनेश चंडीमलने 208 चेंडूत 15 चौकारांसह 116, मॅथ्युजने 185 चेंडूत 7 चौकारांसह 88, करुणारत्नेने  4 चौकारांसह 46 धावा तसेच धनंजय डिसिल्वाने 80 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा जमविल्या.

मॅथ्युज आणि कमिंदू मेंडीस या जोडीने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि मॅथ्युज आपल्या 78 या कालच्या धावसंख्येत आणखी 10 धावांची भर घालत तंबुत परतला. फिलीप्सने त्याला झेलबाद केले. मॅथ्युज आणि कमिंदू मेंडीस यांनी चौथ्या गड्यासाठी 107 धावांची शतकी भागिदारी केली. मॅथ्युज बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार डिसिल्वाने कुशल मेंडीस समवेत पाचव्या गड्यासाठी 74 धावांची भर घातली. फिलीप्सने डिसिल्वाला झेलबाद केले. लंकेची यावेळी स्थिती 5 बाद 402 अशी होती.

द्विशतकी भागिदारी

कमिंदू मेंडीस आणि कुशल मेंडीस या जोडीने आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेताना 6 व्या गड्यासाठी अभेद्य 200 धावांची भागिदारी केली. कमिंदू मेंडीसने 250 चेंडूत 4 षटकार आणि 16 चौकारांसह नाबाद 182 तर कुशल मेंडीसने 149 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 106 धावा जमविल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यास सुमारे तासभर असताना लंकेने डावाची घोषणा केली. लंकेने पहिला डाव 163.4 षटकात 5 बाद 602 धावांवर घोषित केला. उपाहारावेळी लंकेची स्थिती 5 बाद 402 अशी होती तर चहापानावेळी लंकेने 5 बाद 519 धावा जमविल्या होत्या. कमिंदू मेंडीसने 147 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह शतक पूर्ण केले. कमिंदूने आपले दीड शतक 227 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने झळकविले. कुशल मेंडीसने आपले शतक 148 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. न्यूझीलंडतर्फे फिलीप्सने 141 धावांत 3 तर साऊदीने 70 धावांत 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडवर चांगलेच दडपण आल्याचे जाणवत होते. त्यांच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर असिता फर्नांडोने सलामीच्या लॅथमला 2 धावांवर निशांकाकरवी झेलबाद केले. त्यानंतर प्रभात जयसुर्याने कॉन्वेला डिसिल्वाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 9 धावा जमविल्या. दिवसअखेर न्यूझीलंडने 14 षटकात 2 बाद 22 धावा जमविल्या. विलियमसन 6 तर पटेल 0 धावावर खेळत आहेत. लंकेतर्फे असिता फर्नांडो आणि जयसुर्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 2009 नंतर न्यूझीलंड विरुद्ध लंकेचा संघ पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या मार्गावर आहे. तसेच न्यूझीलंड विरुद्ध आतापर्यंत झालेल्या 40 सामन्यात लंकेने यावेळी पहिल्यांदा 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच गॅलेच्या मैदानावर न्यूझीलंडने आतापर्यंत झालेल्या 5 कसोटी सामन्यात एकही विजय नोंदविला नाही.

संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 163.4 षटकात 5 बाद 602 डाव घोषित (कमिंदू मेंडीस नाबाद 182, कुशल मेंडीस नाबाद 106, दिनेश चंडीमल 116, अॅन्जेलो मॅथ्युज 88, करुणारत्ने 46, डिसिल्वा 44 अवांतर 9, फिलीप्स 3-141, साऊदी 1-70), न्यूझीलंड प. डाव 14 षटकात 2 बाद 22 (लॅथम 2, कॉन्वे 9, विलियम्सन खेळत आहे 6, पटेल खेळत आहे 0, अवांतर 5, असिता फर्नांडो आणि प्रभात जयसुर्या प्रत्येकी 1 बळी)

कमिंदू मेंडीसची ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी

लंकेचा फलंदाज कमिंदू मेंडीसने कसोटी क्रिकेटमध्ये केवळ आठ सामन्यात एक हजार धावांचा टप्पा गाठण्याचा पराक्रम केला. कमिंदूने 13 डावांत एक हजार धावा जमविण्याचा पराक्रम केला असून त्याने ऑस्ट्रेलियाचे दिवंगत महान क्रिकेटपटू सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे माजी कसोटीवीर हर्बर्ट सटक्लिफ आणि विंडीजच्या एव्हर्टन वीक्स यांनी 12 डावांमध्ये एक हजार धावांचा टप्पा गाठत विक्रम केला होता. पण 1949 नंतर लंकेच्या कमिंदू मेंडीसने जलद एक हजार धावा करण्याचा नवा विक्रम केला असून त्याने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कमिंदूने 13 डावांमध्ये 5 शतके नोंदविली असून कसोटी क्रिकेटमध्ये जलद एक हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. कमिंदू मेंडीसने डॉन ब्रॅडमन आणि विंडीजच्या जॉर्ज हॅडली यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2024 च्या क्रिकेट हंगामामध्ये कमिंदू मेंडीसची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध यापूर्वी झालेल्या दोन मालिकांमध्ये लंकेतर्फे कमिंदू मेंडीसने सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेतील कमिंदू मेंडीसचे हे दुसरे शतक आहे. कमिंदूने कसोटी पदार्पणानंतर सलग आठ अर्धशतके नोंदविण्याचा विक्रमही केला आहे.

वर्ष   विरुद्ध   धावा

2022        ऑस्ट्रेलिया    नाबाद 61

2024        बांगलादेश      नाबाद 102 व 164

2024        बांगलादेश      नाबाद 92

2024        इंग्लंड      नाबाद 113

2024        इंग्लंड      नाबाद 74

2024        इंग्लंड      नाबाद 64

2024        न्यूझीलंड        नाबाद 114

2024        न्यूझीलंड        नाबाद 182.

Advertisement
Tags :

.