आशिया चषकात लंकन महिला प्रथमच‘चॅम्पियन्स’
भारतावर 8 गड्यांनी मात, चमारी अटापटू ‘मालिकावीर’, हर्षिता समरविक्रमा ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ डंबूला
कर्णधार चमारी अटापटू आणि हर्षिता समरविक्रमा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान श्रीलंका महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच आशिया चषकावर आपले नाव कोरले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात लंकेने भारताचा 8 चेंडू बाकी ठेऊन 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. 43 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 61 धावा झोडपणाऱ्या चमारी अटापटूला ‘मालिकावीर’ तर 51 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा झळकाविणाऱ्या हर्षिता समरविक्रमाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण अत्यंत गचाळ झाल्याने लंकेला विजय मिळविणे अधिक सोपे गेले.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 20 षटकात 6 बाद 165 धावा जमवित लंकेला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले. लंकेने 18.4 षटकात 2 बाद 167 धावा जमवित विजय नोंदविला.
भारताच्या डावामध्ये उपकर्णधार स्मृती मानधनाने 47 चेंडूत 10 चौकारांसह 60, रॉड्रिग्जने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29, रिचा घोषने 14 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30, शेफाली वर्माने 19 चेंडूत 2 चौकारांसह 16, हरमनप्रित कौरने 11 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. पूजा वस्त्रकर आणि राधा यादव हे अनुक्रमे 5 आणि 1 धावावर नाबाद राहिले. भारताच्या डावामध्ये 2 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात भारताने 44 धावा जमविल्या होत्या. भारताचे अर्धशतक 44 चेंडूत तर शतक 84 चेंडूत आणि दीडशतक 113 चेंडूत नोंदविले गेले मानधनाने 36 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. भारताने 10 षटकाअखेर 2 बाद 68 धावांपर्यंत मजल मारली होती. लंकेतर्फे दिलहारीने 2 गडी तर प्रबोधिनी, निशानसला व चमारी अटापटू यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दुसऱ्या षटकात लंकेची सलामीची फलंदाज गुणरत्ने केवळ एका धावेवर धावचीत झाली. त्यानंतर कर्णधार अटापटू आणि समरविक्रमा यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत भारतीय गोलंदाजी चांगली झोडपली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 11.2 षटकात 87 धावांची भागिदारी केली. डावातील 12 व्या षटकात दिप्ती शर्माने अटापटूचा त्रिफळा उडविला. त्यानंतर मात्र कर्णधार कौरने भारतीय गोलंदाजीत बदल करुनही तिला शेवटपर्यंत यश मिळाले नाही. समरविक्रमा आणि दिलहारी या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 6.4 षटकात 73 धावांची अभेद्य भागिदारी करुन आपल्या संघाला 8 चेंडू बाकी ठेऊन शानदार विजय मिळवून दिला. समरविक्रमाने 51 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 69 तर दिलहारीने 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 30 धावा झोडपल्या. लंकेच्या डावात 6 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 44 धावा जमविताना 1 गडी गमाविला. लंकेचे अर्धशतक 41 चेंडूत, शतक 80 चेंडूत तर दीडशतक 105 चेंडूत नोंदविले गेले. अट्टापटूने आपले अर्धशतक 33 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने झळकाविले. तर समरविक्रमाने आपले अर्धशतक 43 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नोंदविले. लंकेने 10 षटकाअखेर 1 बाद 80 धावा जमविल्या होत्या.
लंकेच्या महिला क्रिकेटपटूंनी रविवारच्या अंतिम सामन्यात भारताच्या तुलनेत सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करत सातवेळच्या विजेत्या भारतीय संघाला पराभूत करुन पहिल्यांदाच आशिया चषक पटकाविला. आतापर्यंत 9 वेळा खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत तसेच टी-20 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला दुसऱ्यांदा अंतिम फेरीत हार पत्करावी लागली आहे. 2018 साली कौलालंपूर येथे झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला होता. रविवारच्या सामन्यात भारताची गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणही दर्जाहिन झाल्याने लंकेला स्पर्धेचे विजेतेपद मिळविणे अधिक सोपे गेले.
संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकात 6 बाद 165 (स्मृती मानधना 60, घोष 30, रॉड्रिग्ज 29, शेफाली वर्मा 16, हरमनप्रित कौर 11, छेत्री 9, वस्त्रकर नाबाद 5, यादव नाबाद 1, अवांतर 4, दिलहारी 2-36, प्रबोधिनी 1-27, अटापटू 1-28), लंका 18.4 षटकात 2 बाद 167 ( अटापटू 61, समरविक्रमा नाबाद 69, दिलहारी नाबाद 30, गुणरत्ने 1, अवांतर 6, शर्मा 1-30).