पहिल्या कसोटीत लंका विजयाच्या मार्गावर
बांगलादेशसमोर 464 धावांचे आव्हान, डिसिल्वा, मेंडिस यांची शानदार शतके
वृत्तसंस्था/ सिल्हेत
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर लंकेचा संघ बांगलादेशवर मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. लंकेने बांगलादेशला निर्णायक विजयासाठी 511 धावांचे कठीण आव्हान दिले असून बांगलादेशची दुसऱ्या डावात स्थिती 5 बाद 47 अशी केविलवाणी झाली आहे. लंकेच्या दुसऱ्या डावात कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि कमिंदू मेंडिस यांनी शानदार शतके झळकवली.
या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 280 धावा जमविल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 188 धावात आटोपला. लंकेने बांगलादेशवर पहिल्या डावात 92 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर लंकेने 5 बाद 119 या धावसंख्येवरून आपल्या दुसऱ्या डावाला रविवारी पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 110.4 षटकात 418 धावावर आटोपला. कर्णधार धनंजय डिसिल्वाने 179 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारासह 108 धावा तर कमिंदू मेंडिसने 237 चेंडूत 6 षटकार आणि 16 चौकारांसह 164 धावा झळकवल्या. धनंजय डिसिल्वा आणि कमिंदू मेंडिस यांनी सातव्या गड्यासाठी 173 धावांची शतकी भागीदारी केल्याने लंकेचा दुसऱ्या डावात 418 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रभात जयसुर्याने 47 चेंडूत 4 चौकारांसह 25 धावा जमवल्या. करुणारत्नेने 101 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 52, अँजेलो मॅथ्यूजने 3 चौकारांसह 22 तर मधुष्काने 1 चौकारांसह 10 धावा जमवल्या. बांगलादेशतर्फे मेहदी हसनने 74 धावात 4 तर नाहीद राणा आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन, एस. इस्लाम आणि खलिद अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत लंकेने 6 बाद 233 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी चहापानापर्यंत 94 षटकात 7 बाद 338 धावापर्यंत मजल मारली होती. बांगलादेशने लंकेच्या 350 धावा फलकावर लागल्यानंतर दुसरा नवा चेंडू घेतला. दरम्यान कमिंदू मेंडिसने नव्या चेंडूवर आक्रमक फटकेबाजी करत आपले दीडशतक 228 चेंडूत 5 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. मेंडिसने रजितासमवेत शेवटच्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली.
बांगलादेशला लंकेकडून निर्णायक विजयासाठी 511 धावांचे कठीण आव्हान मिळाल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव दडपणाखाली कोलमडला. शेवटच्या तासभराच्या कालावधीत लंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा निम्मा संघ 47 धावात तंबूत परतला. झकीर हसनने 2 चौकारांसह 19 धावा जमवल्या. मेहमुदुल हसन जॉयला तसेच शहदात हुसेन आणि लिटॉन दासला आपले खातेही उघडता आले नाही. कर्णधार शांतोने 6 धावा जमवल्या. मोमीनुल हक 7, तर ताजुल इस्लाम 6 धावावर खेळत आहेत. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून लंकेचा संघ सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी आपल्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब करेल. लंकेतर्फे विश्वा फर्नांडोने 13 धावात 3 तर रजिता आणि कुमारा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 280, बांगलादेश प. डाव 188, लंका दु. डाव 110.4 षटकात सर्वबाद 418 (कमिंदू मेंडिस 164, धनंजय डिसिल्वा 108, करुणारत्ने 52, मॅथ्यूज 22, मधुष्का 10, प्रभात जयसुर्या 25, अवांतर 26, मेहदी हसन 4-74, नाहीद राणा 2-128, टी. इस्लाम 2-75, एस. इस्लाम 1-75, के. अहमद 1-46). बांगलादेश दु. डाव 13 षटकात 5 बाद 47 (झकीर हसन 19, शांतो 6, मोमीनुल हक खेळत आहे 7, टी. इस्लाम खेळत आहे 6, अवांतर 9, विश्वा फर्नांडो 3-13, रजिता 1-19, कुमारा 1-6).