कद्रा-कोडसळ्ळी रस्त्यावर दरड कोसळली
वाहतूक ठप्प : मुसळधार पावसामुळे मातीचे ढिगारे
कारवार : काळी नदीवरील कद्रा आणि कोडसळ्ळी पाणलोट क्षेत्र असलेल्या कारवार,जोयडा आणि यल्लापूर तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कद्रा आणि कोडसळ्ळी दरम्यान एकमेव रस्त्यावर गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून बाळेमनी, सुळगेरी या गावांचा कारवार तालुक्यापासून संपर्क तुटला आहे. दरड कोसळलेले ठिकाण कद्रा धरणापासून 12 कि. मी. अंतरावर तर कोडसळ्ळी धरणापासून 22 कि. मी. अंतरावर आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कद्रा धरण पाणलोट क्षेत्रात 163 मि.मी. तर कोडसळ्ळी धरण पाणलोट क्षेत्रात 105 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची संततधार सुरू आहे. रस्त्यावर सुमारे 50 मीटर लांब इतके मातीचे ढिगारे आहेत. मातीच्या ढिगाऱ्याबरोबर अनेक वृक्षही उन्मळून पडले आहेत. शिवाय विद्युत खांबांची फार मोठी हानी झाली आहे. तथापि, मातीचे ढिगारे कोसळल्याने कद्रा किंवा कोडसळ्ळी धरणांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाही. मातीचे ढिगारे हटवून या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कर्नाटक विद्युत महामंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. या रस्त्यावरून केपीएसच्या वाहनांची आणि कमर्चाऱ्यांची ये-जा सुरू असते. दरड पहाटे कोसळल्याने कोणतीही हानी झालेली नाही, असे सांगितले.