चीनमध्ये भूस्खलन, 47 लोक ढिगाऱ्याखाली
दोघांचा मृत्यू: अनेक घरे उद्ध्वस्त, 500 जणांची सुटका
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या युनान प्रांतातील झाओतोंग शहरात सोमवारी सकाळी भूस्खलन झाले. दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून सदर आकडा वाढण्याची अपेक्षा आहे. अजूनही 47 लोक ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 500 लोकांना वाचवण्यात यश आल्याचा दावा केला जात आहे. चीनमधील सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. सोमवारी पहाटे भूस्खलन झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अचानक बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज झाला. याच सुमारास जमिनीत हादरे बसल्याने भूकंप झाल्यासारखे वाटल्याचे सांगण्यात आले.
युनान प्रांतात अनेक पर्वत असून हिवाळ्यात तेथे अशा पद्धतीच्या घटना घडतात. भूस्खलनानंतर डोंगरावरील ढिगारे सखल भागात बांधलेल्या घरांवर कोसळले. यात 18 घरांची पडझड झाली आहे. हलकी बर्फवृष्टी अजूनही सुरू आहे. भूस्खलन कसे झाले याची माहिती सध्या उपलब्ध नाही. लोकांच्या सुरक्षेबाबत या भागात काय व्यवस्था करण्यात आली, याचीही माहिती प्रशासनाने दिलेली नाही.
भूस्खलनानंतर लिआंगशुई परिसरात जेसीबींच्या मदतीने ढिगारा हटवला जात आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी जारी केलेल्या या फुटेजमध्ये बचाव कर्मचारी ढिगाऱ्यांमधून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. जवळपास 200 बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. भूस्खलन झालेल्या भागात हवामान खराब असल्यामुळे बचावकार्यात व्यत्यय येत आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने लोकांना वाचवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या येथील तापमान उणे असून हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुसळधार हिमवृष्टीचा इशारा दिला आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये 21 मृत्यू
चीनमधील शिआन येथे ऑगस्ट 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू झाला होता. भूस्खलन आणि पुरामुळे महामार्गाचेही नुकसान होऊन सुमारे 900 घरांची बत्ती गुल झाली होती.