For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस भवनसाठी हिंडलग्यात जमीन देणार

10:52 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस भवनसाठी हिंडलग्यात जमीन देणार
Advertisement

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : 1 एकर पडीक जमीन मार्गदर्शी मूल्याच्या 5 टक्के दराने मंजूर

Advertisement

बेंगळूर : राज्य सरकारने हिंडलग्यात काँग्रेस भवन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिंडलगा गावातील रि.स.नं. 189/1 मधील 1 एकर पडीक जमीन मार्गदर्शी मूल्याच्या 5 टक्के दराप्रमाणे काँग्रेस भवन ट्रस्ट (आर) बेंगळूर यांना मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.  कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी ही माहिती दिली. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मुरुगोड येथील आर. एस. नं. 840 मधील 5 एकर सरकारी जमीन मे. मुरुगोड कंकण निर्मिती फौंडेशनला विनाशुल्क 35 वर्षांच्या लीजवर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सुधारित एमएसई-सीडीपी मार्गसूचीनुसार आवश्यक 15 टक्के (149.31 लाख रु.) राज्य सरकारकडून मंजूर करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 2025-26 या सालात 15 व्या वित्त आरोगाच्या अनुदानांतर्गत राज्यभरात 114 आयुष्मान आरोग्य मंदिरे निर्माण करण्यात येतील. या कामासाठी अंदाजे 74.10 कोटी रु. खर्च करण्यात येतील. केटीटीपी कायदा आणि नियमांनुसार टेंडर बोलावून हे काम हाती घेण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

दांडेलीतील प्रजासौधसाठी 12.49 कोटी रु.

Advertisement

कारवार जिल्ह्यातील दांडेली येथे निर्माण करण्यात येणाऱ्या ‘प्रजा सौध’ तालुका प्रशासन केंद्र इमारत कामासाठी नुकताच 10 कोटी रु. देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सदर रकमेबरोबरच इतर बाबींसाठी होणाऱ्या रकमेचा विचार करून सुधारित 12.49 कोटी रु. खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

मुधोळ ब्लॉक काँग्रेसला कार्यालयासाठी मालमत्ता लीजवर 

बागलकोट जिल्ह्याच्या मुधोळ तालुक्यातील इंगळगी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील झुंजरकोप्प येथील सर्व्हे नं. 145/एफ मधील प्लॉट नं. 81 मधील 1,077.17 चौ. मीटर विस्तीर्ण मालमत्ता मुधोळ ब्लॉक काँग्रेस कार्यालयासाठी लीजवर देण्यास मंत्रिमंडळाने संमती दर्शविली.

कारवारच्या मुळकोडू येथे बंधारेवजा पूल

कारवार जिल्ह्यातील होन्नावर-भटकळ मतदारसंघातील मुळकोडू गावानजीक शरावती नदीवर बंधारेवजा पूल निर्माण केला जाईल. या योजनेच्या 200 कोटी रु. च्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

विविध विधेयकांना संमती

औषधे आणि सौंदर्य प्रसाधने दुरुस्ती विधेयक-2025, कर्नाटक चित्रपट, कर्नाटक राज्य विद्यापीठ (दुसरे दुरुस्ती) विधेयक-2025 आणि सांस्कृतिक कार्यकर्ते (कल्याण) दुरुस्ती विधेयक-2025 या विधेयकांना मंत्रिमंडळ बैठकीत संमती दर्शविण्यात आली आहे. ही विधेयके बेळगावमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.

चन्नम्मा विद्यापीठाचे फेरनामकरण होणार

बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठाचे फेरनामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यापीठाला आता ‘कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठ’ असे नाव देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या फेरनामकरणासाठी कर्नाटक राज्य विद्यापीठ (दुसरे दुरुस्ती) विधेयक-2025 ला मंत्रिमंडळ बैठकीत संमती दर्शविण्यात आली आहे. हे विधेयक बेळगावमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.