जय किसान भाजी मार्केटचा लँड यूज बदल रद्द
खोटी माहिती दिल्याने अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका : म्हणणे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देऊनही कोणतेच उत्तर नाही
बेळगाव : जयकिसान भाजी मार्केटसाठी लँड यूज बदलण्यासाठी बुडाला अर्जदारांनी खोटी माहिती देण्यासह बनावट व चुकीची कागदपत्रे सागर केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 11.12.2014 च्या शासन आदेश क्रमांक 7 नुसार कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती दिली असल्यास जमिनीचा लँड यूज आपोआप रद्द होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार जय किसान भाजी मार्केटला याबाबत आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस देऊन सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण नोटिसीला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे जय किसान भाजी मार्केटचा लँड यूज रद्द झाल्याचा आदेश बुडा आयुक्त शकीलअहमद यांनी सोमवार दि. 25 रोजी जारी केला आहे. बेळगाव शहरातील सर्व्हे क्रमांक 677, 678, 679/1, 680/1, 686/1, 686/2, 696, 697/2, 698/1 आणि 698/2 मधील 10 एकर 20 गुंठे शेतजमीन व्यावसायिक (भाजीपाला घाऊक बाजार) उद्देशात बदल करण्याचा प्रस्ताव करीमसाब खतलसाब बागवान, मोहन पुन्नाप्पा मन्नोळकर, दिवाकर यल्लाप्पा पाटील, उमेश कल्लाप्पा पाटील, सुनील शिवाजी भोसले आणि संजय बसलिंगप्पा भावी यांनी 7 ऑक्टोबर 2013 रोजी बुडाकडे दिला होता.
यासाठी 28 फेब्रुवारी 2014 मध्ये बुडाच्या झालेल्या बैठकीत विषय क्र. 14 मध्ये सदर विषय चर्चेला घेण्यात आला. त्यावेळी सदर शेतजमीन व्यावसायिक (भाजीपाला घाऊक बाजार)साठी वापर करण्यासंदर्भातील प्रस्ताव संचालक, शहर आणि ग्रामीण योजना विभागाच्या माध्यमातून सरकारला पाठविण्याचा निर्णय सदर सभेत घेण्यात आला. त्यानुसार 24 मे 2014 रोजी संचालक शहर आणि ग्रामीण योजना खाते बेंगळूर यांना पाठविण्यात आला. कर्नाटक शहर आणि ग्रामीण योजना कायदा 1961 चे कलम 14 (अ) नुसार सदर शेत जमिनीचे व्यावसायिक (भाजीपाला घाऊक बाजार) क्षेत्रात भू परिवर्तन करण्यात आले. यासाठी 11 डिसेंबर 2014 रोजी सशर्त मंजुरी देण्यात आली. मात्र, वरील सर्व्हे नंबरमधील शेत जमिनीचे लँड यूज बदल करण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जात काही त्रुटी आहेत, अशी तक्रार सिद्धगौडा मोदगी, राजाध्यक्ष भारतीय कृषी समाज, राजशेखर पाटील व इतर शेतकरी संघटनेच्यावतीने बुडाकडे करण्यात आली होती.
लँड यूजसाठी अर्ज केलेल्या सर्व्हे नंबर 686/1 पैकी 22 गुंठे आणि सर्व्हे नंबर 698/1 मधील 11 गुंठे जमीन दिवंगत बसलिंगप्पा सिद्धनायकप्पा भावी यांच्या मालकीची आहे. त्यांचे 29 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झाले आहे. अर्जदारांनी सदर बाब लपवून 7 ऑक्टोबर 2013 रोजी बुडाकडे लँड यूज बदलाचा प्रस्ताव दिला होता. म्हणून सरकारच्या 11 डिसेंबर 2014 च्या आदेशातील कलम क्रमांक 7 मध्ये असे म्हटले आहे की, जर कोणीही खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे दिली असतील तर जमिनीचे लँड यूज अपोआप रद्द होईल. सदर अर्जदारांनी सरकारी आदेशाच्या कलम क्रमांक 7 चे उल्लंघन केल्यामुळे सिद्धगौडा मोदगी व इतरांनी सरकार आणि बुडाकडे कागदपत्रांसह तक्रार केली होती. सदर प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारींची व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका
सर्व्हे क्रमांक 686/1 मधील 22 गुंठे आणि सर्व्हे क्रमांक 698/1 मधील अकरा गुंठे जमिन बसलिंगप्पा सिद्धनायकप्पा भावी यांच्या मालकीची आहे. त्यांचे 29 नोव्हेंबर 2011 रोजी निधन झाले आहे. असे कागदपत्रांवरून दिसून येते. 7 ऑक्टोबर 2013 रोजी लँड यूजसाठी केलेल्या अर्जावर बसलिंगप्पा भावी यांचे नाव व सही नसली तरी सातबारा उताऱ्यावर मात्र भावी याचे नाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे 11 डिसेंबर 2014 च्या सरकारी आदेश क्रमांक 7 या अटीचे उल्लंघन होत असल्याने लँड यूजचा आदेश मागे घेण्यासंदर्भात बुडाकडून 26 सप्टेंबर 2024 रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार सरकारने बुडाला 6 ऑगस्ट 2025 रोजी सदर जमिनीचे लँड यूजबदल रद्द करण्यासंदर्भात निर्देष दिले होते. त्यानुसार अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत सर्व्हे क्रमांक 677, 678, 679/1, 680/1, 686/1, 686/2, 696, 697/2, 698/1 आणि 698/2 मधील 10 एकर 20 गुंठे जागेचा लॅन्ड यूज आपोआप रद्द झाल्याचा आदेश बुडा आयुक्तांनी दि. 25 रोजी जारी केला आहे.