जमीन महसूल नोंदणी बागायतच्या नावावर करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना : सभागृहात बैठक
बेळगाव : जिल्ह्यातील विविध बागायत क्षेत्रातील जमीन महसूल नोंदणी कागदपत्रे बागायत खात्याच्या नावावर हस्तांतरित करून घ्यावीत. यासाठी बागायत अधिकाऱ्यांनी स्वत: प्रांताधिकारी, तहसीलदार अधिकाऱ्यांना संपर्क साधून समन्वयातून कार्य करावे. त्याचबरोबर बागायत क्षेत्र व रोपवाटिकांमध्ये उत्कृष्ट दर्जाची फळांची कलमे व रोपट्यांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना वितरित करण्याची सूचना जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केली. जि. पं. सभागृहात आयोजित बागायत विकास संस्था योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील विविध बागायती क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नाबार्ड किंवा इतर संबंधित विभागांना शक्य तितक्या प्रस्ताव सादर करावा. याचबरोबर बागायत क्षेत्रात व रोपवाटिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बागायत क्षेत्रांची माहिती देताना उपसंचालक महांतेश मुरगोड म्हणाले, काही क्षेत्र विविध विभागांच्या नावावन असून ती बदलून त्यावर बागायत खात्याचे नाव देण्यात यावे. तसेच विविध भागात पायाभूत सुविध निर्माण करण्यात येत असून बागायत क्षेत्रांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
याचबरोबर त्यांनी दोन वर्षाच्या कृती आराखड्याबाबत माहिती देऊन क्षेत्रांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, राणी चन्नम्मा बागायत महाविद्यालयाचे डॉ. दिलीप मसूती, कृषी खात्याचे उपसंचालक एच.डी.कोळेकर, पशूसंगोपन खात्याचे उपसंचालक रवी सालीगौडर, रेशीम खात्याचे उपसंचालक महेशकुमार वागे, मस्यव्यवसाय खात्याचे उपसंचालक संतोष कोप्पद, एपीएमसीचे व्यवस्थापक चबनूर, उद्योग खात्याचे साहाय्यक संचालक ए. आय. पठाण, बागायत खात्याचे साहाय्यक संचालक के. एन. श्यामंत यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.