बार्देश, पेडणेतील जमीन दरात वाढ
मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय : तीन हजारावरुन आठ हजार दर,व्यावसायिक जमीन वापरास लागू, सामान्य लोकांना फटका नाही
पणजी : बार्देश आणि पेडणे तालुक्यातील जमिनीचे कमीत कमी 3 हजार ऊपये प्रती चौरस मीटरावरून 8 हजार ऊपये प्रती चौरस मीटर दरवाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, ही दरवाढ केवळ व्यावसायिक जमीन वापरासाठी असून, घरगुती वापरासाठीच्या दरात बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथील मंत्रालयात काल गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आल्यानंतर बैठकीतील निर्णयाची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. यावेळी मच्छीमारी खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित होते.
महसूल वाढीसाठी निर्णय
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सरकारचा महसूल वाढण्यासाठी बार्देश आणि पेडणे तालुक्यातील जमिनीचे दर वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बार्देश आणि पेडणे या दोन तालुक्यातील जमिनीचे दर 3 हजार ऊपये प्रती चौरस मीटरावरून 8 हजार ऊपये प्रती चौरस मीटर असे होणार आहेत. या दोन तालुक्यात जमीन विक्रीचे प्रमाण वाढत आहे. तसेच बांधकाम आणि इतर प्रकल्प सुरू होत आहेत. इतर तालुक्यातील 3 हजार ऊपये चौरस मीटर हा पूर्वीचाच दर तसाच ठेवण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सामान्य जनतेला फटका नाही
जमिनीच्या या दरवाढीचा सामान्य जनतेसाठी फटका बसणार नाही, याची काळजी सरकारने घेतलेली आहे. 500 चौरस मीटरापर्यंतच्या जमिनीसाठी पूर्वीचाच 3 हजार ऊपये प्रती चौरस मीटर दर राहील. 500 चौरस मीटरांहून अधिक चौरस मीटर जमिनीसाठी 8 हजार ऊपये दर लागू होतील. घरे बांधण्यासाठी ज्या जमिनींची खरेदी, विक्री होते त्यांना फटका बसणार नाही. सामान्य व्यक्तीही घर बांधण्यासाठी 500 चौरस मीटरापर्यंत जमिनीची खरेदी करू शकतात किंवा करतात असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. बाळ्ळी येथे कोकण रेल्वेच्या 220 केव्ही सब स्टेशन उभारणीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.पर्वरी येथील जुन्या मार्केटातील 18 गाळ्यांचे नव्या मार्केटामध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
दोन दशलक्ष खाणमालाचा होणार ई लिलाव
राज्यातील चार जागांवरील 2 दशलक्ष खाणमालाचा ई लिलाव करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. जेटी तसेच इतर ठिकाणी असलेल्या खाणमालाच्या लिलावाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आतापर्यंत 29 ई लिलाव झाले आहेत. आता 30 व्या ई लिलावामध्ये 2 दशलक्ष खाणमालाचा ई लिलाव होईल. खाण मालाच्या ई लिलावामुळे ऑक्टोबरपासून ट्रकांची वाहतूक सुरू होईल. लिलाव करण्यात आलेली एक खाण सुरू झाली असून, नोव्हेंबरपर्यंत चार खाणी सुरू होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.