For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमीन फोडीत फेरफार : तीन भू-मापन अधिकाऱ्यांचे निलंबन

10:39 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
जमीन फोडीत फेरफार   तीन भू मापन अधिकाऱ्यांचे निलंबन
Advertisement

खानापूर तालुक्यातील हुळंद गावच्या 508 एकर जमिनीच्या पीटीशीटमध्ये फेरफार केल्याचा परिणाम : खातेनिहाय चौकशीसाठी समिती नियुक्त

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गंम भागातील हुळंद या गावच्या ग्रामस्थांच्या मालकीची सर्व्हे नंबर 3 मधील 508 एकर जमिनीच्या पीटीशीटमध्ये फेरफार केल्याने तसेच संबंध नसलेल्यांची नावे दाखल केली होती. याबाबत 25 ऑक्टोबर रोजी हुळंद ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच प्रांताधिकारी व विभागीय भू-मापन अधिकारी यांच्याकडे खानापूर भू-मापन केंद्रातील अधिकारी व सर्वेअर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याबाबत विभागीय भू-मापन  अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून खानापूर भू-मापन केंद्राचे प्रभारी आर. सी. पत्तार तसेच ए. सी. किरणकुमार आणि सर्व्हेअर एम. आय. मुतगी यांचे निलंबन केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश विभागीय भू-मापन अधिकाऱ्यांनी दि. 8 जानेवारी रोजी बजावले आहेत. त्यामुळे तालुक्यात  खळबळ माजली असून अधिकारी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे.

जमिनीच्या कागदपत्रात फेरफार

Advertisement

या बाबतची माहिती अशी की,हुळंद येथील सर्व्हे नंबर 3 मधील 508 एकर जमिनीच्या कागदपत्रात व नावावर मोठ्या प्रमाणात फेरफार केला आहे. सर्व्हे नंबर 3 मधील उताऱ्यात संपूर्ण गावचा मालकी हक्क नमूद केला होता. मात्र गावातील वयोवृद्ध नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही एजंटानी ग्रामस्थांची मालकी कमी करून फक्त मोजक्याच जणांची नावे दाखल करून एजंटांनी संदीप गवस, अमित पाटील, परशराम पाखरे या तीन जणांची नावे दाखल केली आहेत. याबाबत हुळंद ग्रामस्थांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सदर जमीन सरकार जमा झाल्याचा आदेशही निघाला होता. असे असताना एजंटानी भू-मापन केंद्रातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून 508 एकर जमिनीच्या नकाशात फोडी करून नकाशात फेरफार केला होता. याची माहिती हुळंद ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थानी ऑक्टोबर 25 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून खानापूर भू-मापन केंद्रातील एम. आय. मुतगी, आर. सी. पत्तार आणि ए. सी. किरणकुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

एजंट अन् हस्तकांचे धाबे दणाणले

याबाबत गेल्या दोन महिन्यापासून चौकशी सुरू होती. वरील तीन अधिकारी दोषी आढळल्याने विभागीय भू-मापन अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे हुळंद जमिनीशी ज्यांचा संबंध नाही, अशांची नावे दाखल करणाऱ्या एजंटांची आणि त्यांच्या हस्तकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच खानापूर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यातूनही भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकताच तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावरही लोकायुक्तांची धाड पडली असताना एकाचवेळी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

नागरिकांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन एजंटांकडून मोठा गैरव्यवहार

याबाबत हुळंद ग्रामस्थांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, हुळंद येथील ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन काही एजंटांनी गावच्या 508 एकर जमिनीबाबत फार मोठा गैरव्यवहार केलेला आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. याबाबत आम्ही न्यायालयातही दाद मागितली असूनही 508 एकर जमीन संपूर्ण गावची आहे. मात्र काही एजंटांनी काही ठराविक लोकाना हाताशी धरून फक्त 13 कुटुंबांची नावे दाखल करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अलीकडे खानापूर तालुक्यातील दुर्गंम भागातील जमिनीवर मोठ्या उद्योग पतींचा डोळा असल्याने दुर्गंम भागातील जमिनी कवडीमोल दराने हडप करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम काही एजंट करत आहेत. यासाठी हुळंद ग्रामस्थांनी आवाज उठविला असून, नुकताच या भागातील खेड्यातील नागरिकांची बैठक घेऊन एजंटाच्या विरोधात आवाज उठविण्याचे ठरविले असल्याचे हुळंद ग्रामस्थांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.