मडगाव स्टेट बँकेत 75 लाखाच्या जमीन कागदपत्रांची अफरातफर
शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचा कारनामा : गुन्हा दाखल, अद्याप कोणासही अटक नाही
मडगाव : भारतीय स्टेट बँकेच्या मडगाव शाखा मॅनेजरविरुद्ध मडगाव पोलिसानी 75 लाख रुपये किंमतीच्या जमिनीच्या मूळ कागदपत्रात अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. मडगावातील खरंगटे इंजिनिअर्स अॅण्ड बिल्डर्सचे राजेश खरंगटे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मडगाव पोलिसानी स्टेट ब्ँाकेच्या मडगाव शाखा मॅनेजर तसेच कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारीनुसार 26 ऑक्टोबर 2023 पूर्वी भारतीय स्टेट बँकेच्या मडगाव शाखा मॅनेजर व बँक कर्मचाऱ्यांनी सुमारे 75 लाख रुपये किमतीच्या जमिनीच्या मूळ कागदपत्रात फेरफार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराच्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढताना तारण म्हणून जमिनीची कागदपत्रे या बँकेकडे ठेवण्यात आली होती. त्यावेळी ही अफरातफर केल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 409 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वेळीप तपास करीत आहेत.