लॅमिनेटेड कागदाचीही पाकिस्तानात टंचाई
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
अन्नधान्ये आणि पेट्रोल तसेच इतर जीवनावश्यक वस्तू यांची तीव्र दरवाढ सोसणाऱ्या पाकिस्तानात आता लॅमिनेटेड कागदासारख्या वस्तूचीही टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना पासपोर्ट (पारपत्र) मिळणेही कठीण झाले आहे. ही माहिती एका विख्यात वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे.
पासपोर्ट तयार करण्यासाठी लॅमिनेटेड कागद आवश्यक असतो. पाकिस्तान हा कागद नेहमी फ्रान्सकडून आयात करते. तथापि, पाकिस्तानात परकीय चलनाची कमतरता असल्याने हा कागद आयात करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पासपोर्ट तयार करणे अशक्य झाले आहे. परिणामी, पाकिस्तानातील असंख्य नागरिक पासपोर्ट केव्हा मिळणार या विवंचनेत आहेत, अशी माहिती देण्यात आली. पाकिस्तानच्या विदेश विभागानेही या माहितीला दुजोरा दिला आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यापासूनही ही स्थिती आहे. अनेक नागरिक पासपोर्ट कार्यालयांमध्ये खेटे घालत आहेत. पण पासपोर्ट अद्याप तयार नाही, हेच त्यांना ऐकावे लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारसंबंधी लोकांमध्ये नाराजीची भावना वाढत असून लोकांची कोंडी होत असल्याचे या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.