हुपरीतील मदरसा मुस्लिम समाजास वापरण्यास प्रतिबंध! बैठकीत तोडगा निघाला मात्र उपोषण सुरूच
हुपरी वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील गट क्रमांक ८४४/अ /१ पैकी मालमत्ता क्रमांक ४४८९च्या मिळकतीवर मुस्लिम सुन्नत जमियतने अवैधरित्या उभारलेल्या मदरशावर जाण्यास व वापरण्यास प्रतिबंधन करण्याचे व तेथील वीज कनेक्शन तोडण्याबाबतचा तोडगा नगरपरिषद प्रशासन व हिंदुत्ववादी संघटनेच्या बैठकीत निघाला.तसे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी लेखी पत्र दिले. तोडगा निघाला असला तरी त्याची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय हिंदुत्ववादी संघटनेने रात्री उशिराने जाहीर केला.
दरम्यान तात्काळ मुस्लिम समाजाच्या अध्यक्षांना मदरशात समाजास जाण्यास प्रतिबंध करण्याची नोटीस व तेथील वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली जात नाही तोपर्यंत शहर बंद करून उपोषण सुरूच राहणार असे सांगितले.
हुपरी येथे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनेने अवैद्यरित्या उभारण्यात आलेला मदरसा बांधकामावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी सोमवार पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.नितीन काकडे, राजेंद्र पाटील,प्रशांत साळोखे, प्रताप भोसले हे उपोषणाला बसले आहेत. उपोषणास्थळी हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात महाआरती करण्यात आली.
हुपरी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता लवकरात लवकर मदरशात जाण्यास मुस्लिम समाजास प्रतिबंध करण्याची नोटीस समाजाच्या अध्यक्षांना देण्याची व तेथील वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस वीज वितरण मंडळाला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सुप्रीम कोर्टाच्या मनाई आदेशाचा १ ऑक्टोबरनंतर निर्णय झाल्यानंतर अतिक्रमण काढणे तसेच त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणे, या ठिकाणी ही जागा नगरपरिषदेच्या मालकीची आहे, असा बोर्ड लावणे. मदरसा ठिकाणी गेल्यास पोलीस कारवाई करणार, असे लेखी आश्वासन देण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, अरविंद रायबोले, मंडल अधिकारी जानकी मिराशी, अप्पर तहसीलदार दिलीप गायकवाड आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.
यावेळी वकील केदार मुनिश्वर , समीर मुदगल, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख व 'गोकुळ'चे संचालक मुरलीधर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख अजित सुतार, मनसे तालुकाप्रमुख दौलतराव पाटील, भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कागले, मनसेचे शहराध्यक्ष गणेश मालवेकर, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख विनायक विभूते, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन गायकवाड, संयोजक सागर मेथे यांच्यासह मोठया संख्येने उपस्थित होते.