जैन समाज महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी
राज्यमंत्रीपदाचा दर्जा....
मसुरे प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. ललित गांधी यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या या अभिनंदन या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
जैन समाजाच्या धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, विकासासाठी स्वतंत्र महामंडळ असावे अशी मागणी होती. ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करत महामंडळाची स्थापना केली. गेल्या अकरा वर्षात केलेल्या कामाची दखल घेऊन ललित गांधी यांची या महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. महामंडळाचे मुख्यालय मुंबई तर प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय होणार आहे. महामंडळाकडून जैन समाज बांधवांना अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा करून आर्थिक स्तर उंचावणे, समाजासाठी विविध योजना राबविणे, प्राचीन जैन तीर्थांचे संरक्षण व संवर्धन करणे, अति प्राचीन जैन ग्रंथाचे संवर्धन व पुनर्लेखन करणे, पायी विहार करणाऱ्या जैन साधुसंतांच्या विहारासाठी सुरक्षा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मंगल प्रभात लोंढा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, मित्राचे उपाध्यक्ष अजय आशर यांचे आभार मानले असून जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या पदाचा आपण उपयोग करणार असल्याचे यावेळी बोलताना ललित गांधी यांनी सांगितले. ललित गांधी हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विद्यमान अध्यक्ष असून चेंबरच्या माध्यमातूनही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. ललित गांधी यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांनी अभिनंदन केले आहे.