बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर अज्ञाताचा हल्ला
सावंतवाडी प्रतिनिधी
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत असून काल रात्री ते मळेवाड येथून सावंतवाडीकडे येत असताना मळगाव रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या गाडीवर अज्ञाताकडून काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर हल्लेखोराला स्थानिक लोकांनी ताब्यात घेतले. ड्रायव्हरने चपळाईने गाडी बाजूला घेतल्यानेच विशाल परब यांचा जीव वाचला आहे. हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोराने निरवडे येथील जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ,अखेर तो ग्रामस्थांच्या हाती लागला. या हल्लेखोरा सोबत आणखीही दोन अज्ञात लपून बसले होते अशीही माहिती समोर येते. या झालेल्या प्रकाराबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी सर्व हकीकत सांगितली असून त्यांनी या हल्ल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. जनतेसाठी माझा हा लढा सुरूच राहील .मी अशा धमक्यांना घाबरत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणामुळे आता राजकारण अधिकच तापणार आहे एवढे नक्की.