लक्ष्य सेनचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था / कुमामोटो (जपान)
येथे सुरू असलेल्या कुमामोटो मास्टर्स जपान खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान उपांत्य फेरीत जपानच्या निशीमोटोने संपुष्टात आणले. निशीमोटोने पुरूष एकेरीची अंतिम फेरी गाठली.
475000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्केमच्या या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जपानच्या 13 व्या मानांकीत केंटा निशीमोटोने लक्ष्य सेनचा 21-19, 14-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 77 मिनिटे चालला होता. निशीमोटोने पहिल्या गेम 21-19 असा जिंकल्यानंतर सेनने दुसरा गेम 21-14 असा जिंकून रंगत आणला. पण तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात लक्ष्य सेनला निशीमोटोने आपल्या अनुभावाच्या जोरावर 21-12 असे पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. लक्ष्य सेनने 2021 साली झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.