लक्ष्य सेन, सात्विक-चिराग उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ओडेन्स, डेन्मार्क
येथे सुरू झालेल्या डेन्मार्क ओपन 2025 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे लक्ष्य सेन व सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. जीस्के बँक एरेना येथे खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानावर असणाऱ्या लक्ष्य सेनने आयर्लंडच्या 28 व्या मानांकित एन्हात एन्ग्युएनचा 10-21, 21-8, 21-18 असा पराभव केला. सव्वातास ही लढत रंगली होती. लक्ष्यने या सामन्यात अडखळत सुरुवात केली आणि फारसा प्रतिकार न करता पहिला गेम दिला. मात्र दुसऱ्या गेममध्ये त्याने दमदार खेळ करीत बाजू पलटवली आणि केवळ 8 गुण गमवित हा गेम जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये दोघांचाही तोडीस तोड खेळ झाला. अखेरीस लक्ष्यने संयम राखत हा गेम जिंकून आयरिश खेळाडूचे आव्हान संपुष्टात आणले. एन्ग्युएनविरुद्ध मिळविलेला जिंकलेला चारपैकी तिसरा सामना होता.