लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन ओपनचा चॅम्पियन
अंतिम सामन्यात जपानच्या तनाकावर एकतर्फी मात : अवघ्या 38 मिनिटांत जिंकला सामना
वृत्तसंस्था/ सिडनी
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने अफलातून खेळ साकारताना यंदाच्या वर्षातील पहिलेवाहिले जेतेपद पटकावले आहे. लक्ष्यने जपानच्या युशी तनाकाचा अवघ्या 38 मिनिटांत पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले. एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात लक्ष्यने विजय मिळवल्यानंतर कानात बोटे धरुन आनंद साजरा केला.
रविवारी सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये लक्ष्यने उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे, शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीचा सामना जिंकण्यासाठी लक्ष्यला 80 मिनिटे मिनिटे झुंज द्यावी लागली होती, परंतु अंतिम सामन्यात त्याने दमदार कामगिरी करत केवळ 38 मिनिटांत विजय मिळवला. विशेष म्हणजे, 2017 मध्ये किदांबी श्रीकांतनंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा लक्ष्य हा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू बनला आहे. 38 मिनिटांच्या या लढतीत त्याने जपानच्या युशी तनाकाचा 21-15, 21-11 असा पराभव केला. नेटजवळ त्याने सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारत प्रतिस्पर्धी खेळाडूला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही.
सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना लक्ष्यने 6-3 अशी आघाडी घेतली. तनाका नेट आणि ओव्हरहिट शॉट्समध्ये चुका करत राहिला. ब्रेकपर्यंत लक्ष्य 11-8 अशा आघाडीवर होता. ब्रेकनंतर लक्ष्यचा खेळ पुन्हा मजबूत झाला. बॅकहँड स्मॅश आणि क्रॉस-कोर्ट विनरने त्याला 17-13 अशी आघाडी मिळवून दिली. तनाकाच्या वारंवार चुकांमुळे लक्ष्यला पाच गेम पॉइंट मिळाले आणि त्याने पहिला गेम 21-15 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्येही तनाकाकडून चुका होत राहिल्या. लक्ष्यने नेटजवळ सुरेख खेळ करत हा गेम 21-11 असा जिंकला आणि जेतेपदाला गवसणी घातली.
यंदाच्या वर्षातील पहिलेच जेतेपद
जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने शेवटचे 2024 मध्ये लखनौ येथे सय्यद मोदी इंटरनॅशनल (सुपर 300) जिंकले होते. त्यानंतर हे त्याचे पहिलेच मोठे सुपर 500 विजेतेपद आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये तो हाँगकाँग सुपर 500 च्या अंतिम फेरीतही पोहोचला होता, परंतु विजेतेपद जिंकण्यात त्याला अपयश आले. यंदा मात्र ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत शानदार कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली आहे.