लक्ष्य सेन उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / सिडनी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने आपल्याच देशाच्या आयुष शेट्टीचा पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र या स्पर्धेत पुरूष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सातव्या मानांकीत लक्ष्य सेनने 20 वर्षीय आयुष शेट्टीचा 23-21, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. आता लक्ष्य सेनचा उपांत्य फेरीचा सामना चीन तैपेईच्या चेनबरोबर होणार आहे. दुसऱ्या एका सामन्यात चीन तैपेईच्या चोयु चेनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फरान अल्वीचा 13-21, 23-21, 21-16 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
या स्पर्धेत पुरूष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान इंडोनेशियाच्या अल्फीयान आणि फिक्री यांनी संपुष्टात आणले. दुहेरीच्या सामन्या इंडोनेशियाच्या फजर अल्फीयान आणि मोहम्मद फिक्री यांनी सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांचे आव्हान 21-19, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत किदांबी श्रीकांतला यापूर्वीच पराभव पत्करावा लागला असल्याने आता भारताचे एकूण या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.