लक्ष्य सेन, आयुष शेट्टी दुसऱ्या फेरीत दाखल
मकाव ओपन बॅडमिंटन : उन्नती, प्रणॉय, किरण जॉर्ज पराभूत, मिश्र दुहेरीतही अपयश
वृत्तसंस्था/ मकाव
भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, आयुष शेट्टी व तरुण मनेपल्ली यांनी येथे सुरू असलेल्या मकाव ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.
राष्ट्रकुल चॅम्पियन असलेल्या लक्ष्य सेनने कोरियाच्या जेऑन ह्योओक जिनचा 21-8, 21-11 असा सहज पराभव केला तर जागतिक 31 व्या मानांकित आयुष शेट्टीने चिनी तैपेईच्या हुआंग यु काइवर 21-10, 21-11 अशी मात केली. तरुण मनेपल्लीने आपल्याच देशाच्या मनराज सिंगचा 21-19, 21-13 असा पराभव केला. लक्ष्यची पुढील लढत इंडोनेशियाच्या चिको ऑरा ड्वि वार्डोयो आणि रित्विक संजीवी सतीश कुमार यापैकी एकाशी होईल. आयुषची पुढील लढत मलेशियाच्या होहशी तर तरुणची लढत अग्रमानांकित हाँगकाँगच्या ली चेउक यिउ याच्याशी होईल.
मिश्र दुहेरीत पाचव्या मानांकित ध्रुव कपिला व तनिषा क्रॅस्टो या जागतिक क्रमवारीतील 18 व्या मानांकित जोडीने थायलंडच्या रॅटचापोल मक्काससिथॉर्न व नत्तामोन लैसुआन यांच्यावर 21-10, 21-15 अशी केवळ 26 मिनिटांत मात केली. पुरुष दुहेरीत भारताच्या पी. कृष्णमूर्ती रॉय व एस. प्रतीक के यांनी आपल्याच देशाच्या डी. कोन्थौजम व अमान मोहम्मद यांचा 21-18, 21-19 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.
मात्र अनुभवी एचएस प्रणॉयचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. इंडोनेशियाच्या योहानेस सौत मार्सेलीनोने प्रणॉयला 18-21, 21-15, 21-15 असे हरविले. सतीश कुमार करुणाकरनलाही पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. मलेशियाच्या जस्टिन होहने त्याला 21-19, 21-12 असे 37 मिनिटांत हरविले.
उन्नती हुडाही पराभूत
महिला एकेरीत उन्नती हुडाने डेन्मार्कच्या ज्युली दवाल जेकब्सेनला झुंजार लढत दिली. पण तिला 21-16, 19-21, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. ही लढत 59 मिनिटे रंगली होती. आणखी एक भारतीय अनुपमा उपाध्यायलाही पराभव पत्करावा लागला. जपानच्या रिको गुंजीने तिला 21-16, 21-10 असे हरविले. शंकर सुब्रमणियन व आकर्षी कश्यप यांचे आव्हानही पहिल्या फेरीत समाप्त झाले. सुब्रमणियनला चीनच्या हु झे अॅनने 21-18, 21-14 तर जपानच्या नोझुमी ओकुहाराने 21-14, 21-16 असे हरविले.
किरण जॉर्ज हाँगकाँगच्या एन्ग का लाँग अँगसची जोड ठरू शकला नाही. अँगसने त्याला 21-15, 21-10 असे केवळ 31 मिनिटांत हरवित आगेकूच केली. महिलांमध्ये अनमोल खर्ब थायलंडच्या ओ. बुसाननविरुद्ध 23-21, 21-11 असे पराभूत झाली तर माजी कनिष्ठ जागतिक अग्रमानांकित तसनिम रिला टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन चेन यु फेइने 21-6, 21-14 असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले.
मिश्र दुहेरीत अपयश
मिश्र दुहेरीत टी. हेमा नागेंद्र बाबू व प्रिया कोन्जेन्गबम यांना थायलंडच्या फुवानात एच-फुंगफा के. यांच्याकडून 21-11, 21-14 असा पराभव स्वीकारावा लागला तर आयुष अगरवाल व श्रुती मिश्रा यांना पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या रेहान नौफाल कुशारजांतो व ग्लोरिया इम्यॅनुएली विडाजा यांच्याकडून 21-10, 21-11 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र आणखी एक भारतीय जोडी रोहन कपूर व रुत्विका शिवानी ग•s यांनाही चिनी तैपेईच्या वु गुआन झुन व ली चिया हसिन यांच्याकडून 20-22, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला.