लक्ष्य, मालविका विजयी, सिंधू पराभूत
वृत्तसंस्था / लंडन
2025 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू झालेल्या अखिल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांनी एकेरीत शेवटच्या 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. महिला विभागात भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मात्र स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले आहे. इंडोनेशियाच्या द्वितीय मानांकित जोनाटेन ख्रिस्टीने विजयी सलामी दिली.
पुरुष एकेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनने चीन तैपेईच्या सु लीयांगचा 13-21, 21-17, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. हा सामना 75 मिनिटे चालला होता. या सामन्यात लक्ष्य सेनने पहिला गेम गमविल्यानंतर पुढील दोन गेम्समध्ये आपल्या अचूक स्मॅश फटक्यावर लियांगला चांगलेच दमविले.
अन्य एका सामन्यात इंडोनेशियाच्या द्वितीय मानांकित जोनाटेन ख्रिस्टीने मलेशियाच्या लियाँगचा 21-11, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत आपल्या मोहीमेला विजयाने प्रारंभ केला. गेल्या जानेवारीत झालेल्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ख्रिस्टीने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. 27 वर्षीय ख्रिस्टीने गेल्या वर्षी पहिली सुपर 1 हजार दर्जाची स्पर्धा जिंकली होती. चीनचा टॉपसिडेड आणि 2018 साली ही स्पर्धा जिंकणाऱ्या शी यु क्विने इंडोनेशियाच्या वार्दोयोचा 21-13, 21-8 त्याच प्रमाणे चीनच्या फेंगने कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-11, 18-21, 21-16 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. भारताच्या प्रणॉयला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी फ्रान्सच्या पोपोव्हकडून पराभव पत्करावा लागला होता.
महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या यांचे मालविका बनसोडने सिंगापूरच्या मीनचा 21-13, 10-21, 21-17 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. गेल्या वर्षी या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या यामागुचीने व्हिएतनामच्या नेगुएनचा 21-19, 21-12 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. यामागुचीचा पुढील फेरीतील सामना मालविका बनसोडशी होणार आहे. जपानच्या यामागुचीने 2022 साली ही स्पर्धा जिंकली होती. बुधवारी भारताच्या पी. व्ही. सिंधूचे एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत कोरियाच्या किमने संपुष्टात आणले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत सिंधूची कामगिरी विविध स्पर्धांमध्ये समाधानकारक झालेली नाही. दरम्यान या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्या फेरीतील सामन्यात कोरियाच्या किमने पी. व्ही. सिंधूचा 19-21, 21-13, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या लढतीत सिंधूने पहिला गेम जिंकल्यानंतर पुढील दोन गेम्समध्ये किमने तिला आपल्या वेगवान स्मॅश फटक्यावर चांगलेच दमवित पराभूत केले.