लक्ष्य, मालविका पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था /ओडेनसी (डेन्मार्क)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या सुपर 750 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीनच्या लु गुवांग झु ने लक्ष्य सेनचा 12-21, 21-19, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात व्हिएतनामच्या लीनने भारताच्या मालविका बनसोडचा 21-13, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. अलिकडेच झालेल्या चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालविकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतच भारताच्या पांडा भगिनींचे आव्हान संपुष्टात आले. चीन तैपेईच्या हुई आणि यांग तून यांनी ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा यांचा 21-18, 24-22 असा पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत भारतीय स्पर्धक आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळते.