चैतन्यपूर्ण वातावरणात भक्तिभावाने लक्ष्मीपूजन
फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांचा लखलखाट : बाजारपेठेत खरेदीसाठी उधाण
बेळगाव : व्यावसायामध्ये वृद्धी व्हावी, यासाठी दरवर्षी उद्योजक, व्यापारी, विक्रेते, आपल्या दुकानांमध्ये दिवाळीनिमित्ताने लक्ष्मी पूजन करत असतात. मंगळवारी शहरासह उपनगरामध्ये लक्ष्मीपूजनाचा उत्साह दिसून आला. फटाक्यांची आतषबाजी तसेच गल्लोगल्ली आरत्याचा गजर व दिव्यांचा लखलखाट पहावयास मिळाला. सोमवारी अमावास्येला सुरूवात झाल्याने बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी त्यादिवशी लक्ष्मीपूजन केले. परंतु अधिकाधिक लक्ष्मीपूजन हे मंगळवारी पारंपरिक पद्धतीने झाले. लक्ष्मीदेवीच्या पुजेने नवीन वर्षाच्या व्यवसायाची सुरुवात करण्यात आली. यामुळे खातेकीर्द वह्यांचेदेखील पूजन करण्यात आले. एकाच वेळी लक्ष्मीपूजन असल्याने पौरोहित्य करणाऱ्यांची धावपळ उडाली होती.
रात्री 7 नंतर सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. लक्ष्मीपूजनाने एक मंगलमय वातावरण शहरात पहायला मिळाले. मुख्य बाजारपेठेसह शहापूर, वडगाव, अनगोळ, टिळकवाडी तसेच इतर भागातही लक्ष्मी पुजनाचा उत्साह दिसून आला.
मागील चार दिवसांपासून बेळगाव शहरात असलेली वाहतूक कोंडी मंगळवारीही पहायला मिळाली. शहरात वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी धर्मवीर संभाजी चौक येथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. उभा मारुती मंदिरापासून चार चाकी वाहनांचे पार्किंग केले जात होते. तरीदेखील शहरात वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. सायंकाळनंतर रिमझिम पाऊस सुरु असल्याने काहीशी वाहतूक कोंडी कमी झाली.
पाडव्याच्या पार्श्वभूमीवर साहित्याची खरेदी
लक्ष्मी पुजनानिमित्त खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. पुजेच्या साहित्यासह पाडव्याच्या पार्श्वभूमीवर साहित्याची खरेदी केली जात होती. झेंडूची फुले, आंब्यांची पाने, हार, केरसुणी, यासह इतर साहित्य खरेदी केली जात होती. फुल व फळांना सर्वाधिक मागणी होती. याबरोबरच गृहोपयोगी वस्तुदेखील खरेदी केल्या जात होत्या.