तालुक्यात लक्ष्मीपूजन भक्तिमय वातावरणात
लक्ष्मीदेवीची पौरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा : ऊस, फुलहारांची सजावट : कारखान्यांना विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी
वार्ताहर/किणये
तालुक्यात दिवाळी सणाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. मंगळवारी लक्ष्मीपूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. तालुक्याच्या विविध गावांमधील तसेच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार यांनी मंगळवारी सकाळपासूनच लक्ष्मी पूजनाला सुरुवात केली. लक्ष्मीदेवीची पौरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. लक्ष्मीपूजनासाठी ऊस, फुलहारांची सजावट अशी मांडणी करण्यात आली होती. तसेच फळे व गोड नैवेद्य दाखविण्यात आला. अगदी मंगलमय अशा वातावरणात महाआरती करण्यात आली. पूजनासाठी आलेल्या सर्वांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. उद्यमबाग औद्योगिक वसाहत, मच्छे औद्योगिक वसाहत, नावगे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त कारखान्यांना आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.