तालुक्यात लक्ष्मीपूजन भक्तिमय वातावरणात
लक्ष्मीदेवीची पौरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा : ऊस, फुलहारांची सजावट : कारखान्यांना विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी
वार्ताहर/किणये
तालुक्यात दिवाळी सणाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. मंगळवारी लक्ष्मीपूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. तालुक्याच्या विविध गावांमधील तसेच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार यांनी मंगळवारी सकाळपासूनच लक्ष्मी पूजनाला सुरुवात केली. लक्ष्मीदेवीची पौरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. लक्ष्मीपूजनासाठी ऊस, फुलहारांची सजावट अशी मांडणी करण्यात आली होती. तसेच फळे व गोड नैवेद्य दाखविण्यात आला. अगदी मंगलमय अशा वातावरणात महाआरती करण्यात आली. पूजनासाठी आलेल्या सर्वांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. उद्यमबाग औद्योगिक वसाहत, मच्छे औद्योगिक वसाहत, नावगे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त कारखान्यांना आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.
तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली. पूजनप्रसंगी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे सुद्धा नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. दिवाळी सणानिमित्त पिरनवाडी, बेळगुंदी, मच्छे येथील बाजारपेठांमध्ये विविध खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. नवीन कपडे, सोने, चांदी, दुचाकी, चारचाकी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील नागरिक दिसत होते. तालुक्याच्या पश्चिम भागात काजुच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर बेळगुंदी परिसरात काजूवरती प्रक्रिया करणारे युनिट आहेत. या युनिटमध्येसुद्धा लक्ष्मीपूजा करण्यात आली. मच्छे व उद्यमबाग औद्योगिक परिसरात विविध कारखान्यांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती.