For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाखो खर्च तरीही फुटपाथ बिनकामाचे

05:58 PM Aug 11, 2025 IST | Radhika Patil
लाखो खर्च तरीही फुटपाथ बिनकामाचे
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

शहरासह उपनगरातील फुटपाथांची झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. उखडलेल्या फरशा, उघडी चेंबर, व्यावसायिकांचे अतिक्रमण, स्टॉल व पार्किंगसाठी वापर होत असल्यामुळे फुटपाथांचा मूळ हेतूच हरवला आहे. यामुळे या फुटपाथवरून चालायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ‘लाखोंचा खर्च करूनही फुटपाथ बिनकामाचे’ अशी स्थिती झाली आहे.

फुटपाथांचा वापर हा पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करण्यासाठी आहे. रस्त्यावरून चलताना अपघात होऊ नये, यासाठी शहराच्या प्रत्येक मार्गावर फुटपाथ बांधली गेली आहे. यासाठी लाखोंचा खर्च केला गेला आहे. मात्र, फुटपाथावर व्यावसायिक दुकानांचे अतिक्रमण, फुटक्या फरशांमुळे लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे.

Advertisement

रंकाळा तलाव परिसर, महावीर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, बसंत बहार रोड, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, सीपीआर, भाऊसिंगजी रोड, मिरजकर तिकटी, शिवाजी पेठ, राजारामपुरी, शाहूपुरीसारख्या मुख्य भागांसह उपनगरानील फुटपाथांवरील फरशा उखडल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. तुटलेल्या फरशांमुळे विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि अपंग व्यक्तींना वापर करण्यास धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे फरशांमधील खड्ड्यांत पाणी साचून पादचाऱ्यांचा पाय घसरण्याचा धोका वाढला आहे.

  • उघडी चेंबर,अपघातांना निमंत्रण

फुटपाथांवरील ड्रेनेज चेंबरची उघडी झाकणे अपघताला निमंत्रण देणारी ठरत आहे. उपनगरातील अनेक भागांमध्ये फुटपाथांवरील चेंबरची झाकणे गायब आहेत. एसएससी बोर्ड ते संभाजीनगर मार्गावरील झाकणे चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. यापूर्वी चेंबरमध्ये जनावरे पडुन जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

  • अतिक्रमण आणि स्टॉल

फुटपाथांचा वापर पादचाऱ्यांसाठी कमी आणि व्यवसायांसाठी जास्त होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथांवर स्टॉल, दुकानांचे अतिक्रमण वाढले आहे. खाद्यपदार्थांचे स्टॉल, कपड्यांचे दुकान, फळे-भाज्यांचे विक्रेते यांनी फुटपाथ व्यापले आहेत. ज्यामुळे पादचाऱ्यांसाठी जागाच शिल्लक राहत नाही. यामुळे नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागत आहे. वाहनांच्या गर्दीत रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे. फुटपाथांवरील अतिक्रमणात वाहनांच्या पार्किंगचाही मोठा वाटा आहे. अनेक दुकानदार आणि नागरिक फुटपाथांवरच आपली वाहने पार्किंग करतात. रस्त्याच्या कडेला वाहने लावल्यामुळे फुटपाथ झाकली जात आहेत. यामुळे फुटपाथांचा मूळ उद्देशच नष्ट होत आहे. मिरजकर तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरीसारख्या व्यावसायिक भागात ही समस्या अधिक गंभीर आहे.

  • नागरिकांची गैरसोय

बाजारपेठेत खरेदीसाठी जाणारे नागरिक, ऑफिसला जाणारे कर्मचारी आणि शाळकरी मुले यांना फुटपाथांवरील अडथळ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. फुटपाथांच्या या दुरवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.

  • कामाच्या दर्जाबाबत शंका

काही दिवसापूर्वी महापलिका अधिकाऱ्यांची टक्केवारीची पोलखोल उघड झाली. यामुळे दर्जात्मक सुविधांवर परिणाम होत आहे. फुटपाथांच्याही कामाची गुणवत्ता खराब असल्याने काही महिन्यांतच फरशा पुन्हा उखडत असल्याचे दिसून येत आहे. फुटपाथांच्या दुरुस्ती आणि अतिक्रमण हटवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. तक्रारींनंतरही महापालिकेकडून केवळ आश्वासने दिली जातात.

  • नागरिकांच्या मागण्या

- फुटपाथांच्या नियमित देखभाल दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात

- अतिक्रमण व पार्किंग हटवण्यासाठी कठोर कारवाईसाठी विशेष पथक नेमावे.

- उघडी चेंबर तातडीने दुरुस्त करून अपघात टाळावेत.

- फुटपाथ बांधकामात उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करावा.

- फुटपाथांच्या कामाचे ऑडिट व्हावे.

  • चालण्यासाठी जागाच नसते

फुटपाथांचा उपयोग आता केवळ दुकानांसाठी आणि पार्किंगसाठी होतो. अनेक ठिकाणी फरशा उखडल्या आहेत. तर चेंबरची झाकणे उघडी आहेत. त्यामुळे चालण्यासाठी जागाच मिळत नाही. यावर ठोस कार्यवाही होणे गरजेचे आहे.
                                                                                                                              - दिपक पाटील, नागरिक

Advertisement
Tags :

.