घटस्थापनेदिवशी यल्लम्मा देवीच्या चरणी लाखो भाविक
वार्ताहर/बाळेकुंद्री
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा रेणुकादेवीच्या सोमवारी नवरात्र उत्सवातील पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी देवीला तेल अर्पण करून दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांनी यल्लम्मा मंदिर परिसरात लावलेल्या दिव्यांना तेल घातले आणि ‘आपले जीवन दिव्यासारखे उजळू दे’ अशी देवीकडे प्रार्थना केली. ‘उदो ग आई उदो...उदो’च्या गजरात भाविकांनी यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरश: उजळून सोडला. सोमवारी सायंकाळी सौंदत्तीचे युवा नेते अश्वत्थ, मंदिर विकास प्राधिकरण कार्यदर्शी अशोक दुडगुंटी, सौंदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेगन्नावर, देवस्थानच्या उपकार्यदर्शी नागरत्ना चोळी, सीपीआय धर्माकर धर्मट्टी, आशाताई कोरे, अल्लमप्रभू प्रभूनावर, अरविंद मळगे व पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना पूजाविधी समारंभ पार पडल्यानंतर गाभाऱ्यासमोर देवीला तेल अर्पण करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या दिव्याला मान्यवरांनी तेल अर्पण करून शुभारंभ केला. बेळगाव, धारवाड, बागलकोट, गदग जिल्ह्यांतील व परराज्यांतील विविध ठिकाणांहून भाविकांनी हजेरी लावल्याने डोंगर फुलून गेला होता. डोंगराच्या पायथ्याशी जोगुळभावी पुंडात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती. नवरात्रोत्सव काळात यल्लम्मा देवस्थानात विशेष महत्त्व असून देवीची विविध रूपात आरास करून देवीची विशेष पूजा बांधण्यात येत आहे.