यल्लम्मा डोंगरावर लाखो भाविकांची उपस्थिती
वार्ताहर/बाळेकुंद्री
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या नवरात्रोत्सवातील शुक्रवारी पाचव्या दिवशी लाखो भाविकांनी देवीला तेल अर्पण करून दर्शनाचा लाभ घेतला. येथे भाविकांना तेल अर्पण करण्यासाठी विविध ठिकाणी दिवे बसविण्यात आले होते. शुक्रवारी देवीला विशेष अलंकार करून सजविले होते. उदे ग आई उदो...उदोच्या गजरात भाविकांनी डोंगर परिसर उधळून सोडला. चार-पाच दिवसांपासून पहाटेपासूनच तेल अर्पण करण्यासाठी बेळगावसह गोवा व महाराष्ट्र या परराज्यातील विविध ठिकाणाहून भाविक बस व खासगी वाहनातून हजेरी लावल्याने सकाळच्या सुमारासच डोंगर फुलून जात आहे.
देवीच्या मंदिरापासून 3 कि. मी. वर डोंगराच्या चढतीवर तिन्ही मार्गांवरून येणाऱ्या कार, टमटम रिक्षा, टॅक्टर, मोटारसायकल व कर्नाटक, महाराष्ट्राच्या 200 हून अधिक बसेसचा ताफा डोंगरावर आल्याने डेंगरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दूरवरच बसेस व इतर वाहने थांबविल्याने भाविक पायी जात होते. पोलीस व वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी ठिकठिकाणी होत होत्या.