लैला फर्नांडीज, डी मिनॉर विजेते
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे झालेल्या डीसी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात कॅनडाच्या लैला फर्नांडीजने तर पुरुषांच्या विभागात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने विजेतेपद पटकाविले.
महिला एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात 22 वर्षीय डावखुल्या लैला फर्नांडीजने रशियाच्या अॅना कॅलिनकेयाचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील 500 दर्जाच्या स्पर्धेतील फर्नांडीजचे हे पहिले जेतेपद आहे. 2021 साली झालेल्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत लैला फर्नांडीजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. वॉशिंग्टनमधील या स्पर्धेत कॅलिनकेयाने राडुकेनुचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सातव्या मानांकीत अॅलेक्स डी मिनॉरने अॅलेजेंड्रो फोकिनाचा 5-7, 6-1, 7-6 (7-3) असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. 2018 साली या स्पर्धेत 26 वर्षीय मिनॉरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. एटीपी टूरवरील स्पर्धेतील मिनॉरचे हे दहावे विजेतेपद आहे. आता एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत मिनॉर पहिल्यांदा पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळवेल.