Solapur : जिल्हा परिषदेच्या आवारात मिळणार लाडू, जिलेबी, करंज्या अन् चकली
रुक्मिणी महोत्सवात महिला बचत गटांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आणि हस्तकलेची झलक
सोलापूर : उमेद अभियानाच्या माध्यमातून दिवाळी रुक्मिणी महोत्सवाचे आयोजन १३ व १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेत करण्यात आले आहे. या उपक्रमातून सोलापूरकरांना महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या लाडू, करंजी, जिलेबी अन् चखलीसह अन्य मिठाईचा स्वाद चाखण्याची संधी निर्माण करुन देण्यात आली आहे.
यामध्ये फटाके वगळता बचत गटांनी उत्पादित केलेला सुकामेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ, पणत्या, आकाश कंदील इ. वस्तू व साहित्य जिल्ह्यातील अनेक स्वयंसहायता समूह बनवीत आहेत. त्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आवारात त्यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी 'रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२५ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
सकाळी १०.०० ते ६.०० पर्यंत जिल्हा परिषदेच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या दिवाळी महोत्सव अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील एकूण स्वयंसहायता समूह यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन करण्यासाठी स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, मीनाक्षी महीवळी, दयानंद सरवळे, अनिता माने, शीतल म्हंता आदी उपस्थित होते.