For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्ममार्गाची शिडी

06:03 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्ममार्गाची शिडी
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

गीतेचे अनेक प्रकार आहेत. त्यातली कुठलीही गीता घ्या, त्यात मनुष्याचा उद्धार कसा होईल हे सांगणे हेच उद्दिष्ट असते. त्यानुसार बाप्पांनी वरेण्य राजाला उद्धार होण्याच्या दृष्टीने उपदेश केलेला आहे. मागील अध्यायात बाप्पांनी सांगितलं की, जीवनात आपण ज्याला चांगला योग समजतो तो खरा चांगला योग नसून चांगले भोग मिळवण्याची संधी असते. चांगला योग म्हणजे ईश्वराशी थेट संबंध येणे. त्यादृष्टीने काय काय करायला हवं ते बाप्पांनी राजाला सांगितलं. ज्ञान म्हणजे काय ते समजावून दिलं तसंच कर्मयोगाचं माहात्म्यही सांगितलं. ते सर्व ऐकून आपण कोणता मार्ग अनुसरायचा असा प्रश्न राजाला पडला आणि इथूनच दुसऱ्या अध्यायाची सुरवात झाली.

वरेण्य उवाच -

Advertisement

ज्ञाननिष्ठा कर्मनिष्ठा द्वयं प्रोत्तं त्वया विभो ।

अवधार्य वदैकं मे निश्रेयसकरं नु किम् ।। 1 ।।

अर्थ- वरेण्य म्हणाला, हे विभो सर्वव्यापी ईश्वऱा, ज्ञानाचे ठिकाणी निष्ठा व कर्माचे ठिकाणी निष्ठा अशा दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्यास. यांपैकी मोक्षप्रद कोणती ती मला सांग.

विवरण- राजानं बाप्पांना विचारलं की, ज्ञानयोग म्हणजे सदैव ईश्वर चिंतनात रममाण व्हायचं हे तुम्ही सांगितलंत पण असा योगी झाला तरी त्याला कर्मे चुकत नाहीत. म्हणून ती निरपेक्षतेने करून तो ती ईश्वराला अर्पण करतो. त्यामुळे नवीन प्रारब्ध तयार होत नाही, हे मला समजले. असे केले की, चालू असलेला जन्म संपला की, मुक्ती मिळते. आता माझा प्रश्न असा की, आधी मी ईश्वर स्मरणात रममाण होऊ की निरपेक्षतेने कर्मे करू? मी कुठून सुरवात करू हेही कृपा करून मला सांगा.

बाप्पा म्हणाले,

अस्मिंश्चराचरे स्थित्यौ पुरोत्ते द्वे मया प्रिय । सांख्यानां बुद्धियोगेन वैधयोगेन कर्मिणाम् ।। 2 ।।

अर्थ- हे प्रिया जगाच्या स्थैर्याकरता दोन निष्ठा मी पूर्वी सांगितल्या. सांख्यांची बुद्धियोगाने आणि कर्मवाद्यांची कर्मयोगाने मुक्ती होते.

विवरण-बाप्पा म्हणतात, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग असे दोन मार्ग मी सांगितले. ज्ञानमार्गामध्ये साधकाने जीवनात जे जे घडतंय ते ते स्वस्थपणे साक्षीरूपाने पाहणे अपेक्षित आहे. हा मार्ग तसा अवघड आहे पण मुक्त होण्यासाठी आवश्यकही आहे. मनुष्य जर जीवनात घडणाऱ्या घटना, भेटणाऱ्या व्यक्ती वा उत्पन्न होणारी परिस्थिती यातच अडकून पडला तर त्याचा उद्धार होणार कसा? हे लक्षात घेऊन त्यानं ज्ञानमार्गाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी कर्ममार्गाची शिडी वापरावी अशी माझी अपेक्षा आहे.

म्हणून मी कर्ममार्ग सांगितलाय. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कर्म अटळ आहे पण कर्म केल्यावर त्या संबंधातलं पाप किंवा पुण्य माणसाच्या वाट्याला येतंच आणि ते भोगण्यासाठी त्याचा पुनर्जन्म होतो. हे टाळण्यासाठी मी कर्म कर आणि ईश्वराला अर्पण कर असा सोपा मार्ग सांगितला. असं करत गेलेला माणूस कर्माकडे त्रयस्थ दृष्टीने पाहू लागतो. वाट्याला जे कर्म आलं ते केलं. त्याच्या फळाबाबत कोणतीही अपेक्षा नसल्याने तो काळजीमुक्त होतो. तसेच कर्म करत असताना पूर्ण होईल का नाही, न झाल्यास काय परिणाम होतील हाही विचार त्याला सतावत नसतो कारण हे कर्म ईश्वराने त्याला दिलेलं असल्याने ती सर्व चिंता ईश्वरानचं करावी अशी विचारसरणी त्यामागे असते. कर्म बंधनात न अडकल्याने प्रारब्ध तयार होत नाही.

ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे तो आपोआप ज्ञानमार्गी साधकाप्रमाणे जीवनाकडे त्रयस्थ दृष्टिकोनातून पाहू लागतो. म्हणून ज्याला सरळसरळ जीवनाकडे त्रयस्थ दृष्टिकोनातून पाहता येत नाही त्यानं कर्ममार्गाने सुरवात केली की, तो अलगद ज्ञानमार्गावर येऊन पोहोचतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.