अतिक्रिकेटमुळे दर्जेदार अष्टपैलूंची कमतरता : जॅक कॅलिस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या जॅक कॅलिसने आधुनिक काळातील क्रिकेटमध्ये, विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंची कमतरता निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले असून त्याला मोठ्या प्रमाणात खेळले जाणारे विविध प्रकारांतील क्रिकेट कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. सर गारफिल्ड सोबर्स (8032 धावा आणि 235 बळी) हे ‘सर्वांत महान’ अष्टपैलू खेळाडू मानले जातात. पण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून 25,000 धावा काढणारा आणि जवळपास 600 बळी घेणारा कॅलिस हा आधुनिक युगातील दिग्गज अष्टपैलूंपैकी एक आहे.
80 च्या दशकात इम्रान खान, रिचर्ड हॅडली, इयान बोथम व कपिल देव असे चार महान अष्टपैलू खेळाडू होते, तर नवीन सहस्रकात कॅलिस आणि अँड्य्रू फ्लिंटॉफचा उदय झाला. परंतु ‘टी20’ क्रिकेटच्या आगमनाने आणि नवीन नियमांसह जगभरात पेंव फुटलेल्या लीगमुळे प्रत्यक्षात अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या विकासाला खीळ बसली आहे. ‘अष्टपैलू खेळाडू दररोज निर्माण होत नाहीत. संपूर्ण इतिहासात पाहिल्यास भरपूर अष्टपैलू खेळाडू दिसणार नाहीत. बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत, पण ज्या प्रमाणात क्रिकेट खेळले जात आहे त्याचा नक्कीच यात वाटा आहे’, असे कॅलिसने एका खास मुलाखतीदरम्यान सांगितले.
दक्षिण अफ्रिकेचा हा माजी कर्णधार लिजेंड्स लीग क्रिकेट खेळण्यासाठी भारतात आला आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगचे नाव घेतले नसले, तरी ‘केकेआर’ संघाच्या या माजी प्रशिक्षकाने ’इम्पेक्ट प्लेयर’ नियमाचा आपण फार मोठा समर्थक नसल्याचे स्पष्ट केले. या नियमानुसार, संघ गरज विचारात घेऊन फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना एक खेळाडू बदलू शकतो. ‘काही ‘टी20’ स्पर्धांमध्ये बदली खेळाडू खेळविता येतो आणि मी त्याचा फार मोठा चाहता नाही. कारण यामुळे संघातील अष्टपैलू खेळाडूची गरज मिटते. ज्या संघांकडे चांगले अष्टपैलू खेळाडू नाहीत ते आता 12 खेळाडूंसह खेळत आहेत. मी याचा फार मोठा चाहता नाही’, असे त्याने सांगितले.
भारत आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार असून कसोटी खेळणाऱ्या प्रमुख देशांपैकी हा एकच असा देश आहे जेथे मागील 31 वर्षांत एकही कसोटी मालिका भारताला जिंकता आलेली नाही. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रीत होईल, जे जागतिक कसोटी स्पर्धेचा भाग आहेत. याशिवाय एकदिवसीय आणि टी20 सामनेही खेळविले जाणार आहेत. मालिकेदरम्यान दोन्ही बाजूंचे विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कागिसो रबाडा यासारखे महत्त्वाचे खेळाडू फक्त कसोटीत खेळताना दिसतील.
हा चांगला भारतीय संघ आहे पण दक्षिण आफ्रिकेला मायदेशी पराभूत करणे कठीण आहे. सेंच्युरियन बहुदा दक्षिण आफ्रिकेला आणि न्यूलँड्स कदाचित भारताला अनुकूल असेल. ही एक चांगली मालिका ठरेल आणि त्यात चुरसपूर्ण लढत पाहायला मिळेल, असे मत कॅलिसने व्यक्त केले.