रेबीजबाबत जनमानसात जागृतीचा अभाव
किणयेच्या युवकाचा बळी आत्मचिंतन करायला लावणारा : रेबीज लसीकरणाकडे दुर्लक्ष, लाळेतून पसरतो विषाणू
प्रतिनिधी/ बेळगाव
किणये येथील युवकाचा रेबीजमुळे जीव गेल्याने रेबीज जागृती व प्रतिबंधक लसीकरणाबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अलीकडे कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. त्यातच स्वत:च्या पाळीव कुत्र्याच्या संपर्कात आल्याने युवकाला शुक्रवारी जीव गमवावा लागल्याने प्रशासन याबाबत गांभीर्याने घेणार का? हे पहावे लागणार आहे.
शहर आणि ग्रामीण भागात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण होत नसल्याने धोका निर्माण होऊ लागला आहे. श्वानप्रेमींचे लसीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने जीव गमावण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आता तरी श्वानप्रेमी आपल्या श्वानांचे वेळोवेळी लसीकरण करणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
रेबीजचे विषाणू अभिषेक नामदेव पाटील या युवकाच्या शरीरात पसरल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आता रेबीज जागृती आणि प्रतिबंधक लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पशुसंगोपन खात्यामार्फत दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्त रेबीज प्रतिबंधक पंधरवडा आयोजिला जातो. यादरम्यान गावोगावी आणि शाळास्तरावर रेबीजबाबत जागृती केली जाते. शिवाय सर्व कुत्र्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहनही केले जाते. मात्र, काही श्वानप्रेमी दुर्लक्ष करून श्वानांना लसीकरणापासून दूर ठेवतात. त्यामुळे जीवघेण्या घटनांना सामोरे जावे लागते.
शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही, हे वास्तव असले तरी त्या दिशेने जनजागृती करून समस्येवर मात करता येते. यासाठी पशुसंगोपन खात्याने अधिक जागृतीचे काम हाती घेऊन एकही कुत्रा लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेणेही आवश्यक आहे.
पशुसंगोपन खात्यामार्फत कुत्र्यांना नि:शुल्क अँटीरेबीज लसीकरण केले जाते. मात्र, काही श्वानप्रेमी निरुत्साही असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच दुर्दैवी घटना वाढू लागल्या आहेत. रेबीज विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी पाळीव आणि सर्व भटक्या कुत्र्यांना प्रतिबंधक लस देणे काळाची गरज बनली आहे.
कुत्र्यांना आवरणार कोण?
अलीकडे शहरासह ग्रामीण भागातही कुत्र्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे अशा कुत्र्यांना वेसण कोण घालणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. त्याचबरोबर बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? हाही प्रश्न कायम आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या शहरवासियांसाठी चिंतेचा विषय ठरू लागली आहे.
रेबीज म्हणजे काय?
रेबीज हा विषाणूद्वारे पसरतो. विशेषत: जनावरे आणि कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. एखाद्या प्राण्याला या आजाराची लागण झाल्यास आणि त्याने मनुष्याचा चावा घेतल्यास त्याच्यातही तो पसरतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या जनावरांच्या लाळेत असतो. जर या आजाराने ग्रस्त असलेले जनावर मनुष्याला चावल्यास हा विषाणू लाळेद्वारे मनुष्याच्या रक्तात मिसळतो. त्यामुळे रेबीजचा मानवाला धोका आहे.
काही श्वानपालकच लसिकरणाकडे दुर्लक्ष करतात
-डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक, पशुसंगोपन खाते)
पशुसंगोपन खात्यामार्फत वेळोवेळी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाते. मात्र, काही श्वानपालकच याकडे दुर्लक्ष करतात. रेबीज लागण झालेल्या जनावर किंवा कुत्र्याच्या संपर्कात आल्यास मानवाला त्याचा धोका पोहोचतो. यासाठी खबरदारी म्हणून वेळोवेळी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.