राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठात ढिसाळ नियोजन
मूल्यांकन अचूकपणे नसल्याने एमबीबीएस विद्यार्थ्यांची तक्रार
बेंगळूर : राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठात (आरजीयूएचएस) एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत व्यवस्थित गुण मिळत नाहीत. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन अचूकपणे होत नाही. त्यामुळे एमबीबीएसचा कोर्स पूर्ण करणे विद्यार्थ्यांना कष्टप्रद ठरत आहे, अशी दस्तुरखुद्द विद्यार्थ्यांनीच तक्रार केली आहे. 2018 च्या पूर्वी राजीव गांधी आरोग्य विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी व्यवस्थितपणे न झाल्याने कोर्स पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले नाही. अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिव (मूल्यमापन) डॉ. रियाज बाशा यांची भेट घेऊन तक्रार मांडली आहे.
विद्यापीठात एमबीबीएस कोर्स करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पाचवेळा तपासणी होते. मूल्यमापन करणारे प्राध्यापक वेगवेगळे गुण देत असतात. एकाद्या विद्यार्थाला दुसऱ्यांदा उत्तरपत्रिका तपासणीच्यावेळी पाच गुण मिळाले असले तरी तिसऱ्यांदा तपासणीच्यावेळी 62 अंक मिळालेले असतात. अन्य एखाद्या विद्यार्थ्याला तिसऱ्या तपासणीच्यावेळी 56 गुण मिळाले असले तरी दुसऱ्या तपासणीच्यावेळी फक्त 4 गुण मिळाले असतात. असा प्रकार अनेक एमबीबीएस विद्यार्थ्यांच्याबाबतीत झाला आहे. उत्तरपत्रिकांची व्यवस्थित तपासणी होत नसल्याने संपूर्ण कोर्समध्ये उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना अशक्य होत आहे. याशिवाय त्यांच्या भवितव्यालाही मार्ग मिळत नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी कुलसचिवांकडे केली आहे
एकाच पद्धतीने मूल्यमापन नाही
उत्तरपत्रिका मूल्यमापनासाठी नेमणूक करण्यात आलेले प्राध्यापक एकाच पद्धतीने मूल्यमापन करीत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी अधिक प्रमाणात गुण मिळत आहेत. यावर पर्याय निवडण्यासाठी विद्यापीठाचे शिष्टमंडळ लवकरच एनएमसी अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे कुलसचिव डॉ. रियाज बाशा यांनी म्हटले आहे.