बेळगाव-चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये बेंचची कमतरता
जिल्हा पंचायत कार्यालय-शिक्षण विभागाकडून बेंच उपलब्धतेसाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
अनेक सरकारी शाळांमध्ये बेंचची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवर बसावे लागते. बेळगाव जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आजही बेंच नसल्यामुळे विद्यार्थी जमिनीवर बसून शिक्षण घेतात. अशा शाळांना बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालय व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने बेंच दिले जात आहेत.
बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये बेंच नसल्याचे शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले होते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 1407 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 6080 अतिरिक्त बेंचची संख्या आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 1477 शाळांमध्ये 1 लाख 86 हजार 513 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 36,507 बेंच उपलब्ध असून अजून 30 हजार बेंचची आवश्यकता आहे.
चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 1595 शाळा असून यामध्ये 1 लाख 97 हजार 477 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या त्या ठिकाणी 37,823 बेंच उपलब्ध असून अजून 24 हजार बेंचची आवश्यकता आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 54 हजार डेस्क गरजेचे आहेत. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी शाळांची पाहणी केल्यानंतर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने त्या ठिकाणचे बेंच धूळखात पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे बेंच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम आखण्यात आली आहे. 7 हजार बेंचसाठीच्या 4 कोटी रुपयांची बचत या उपक्रमाने झाली आहे.
1007 बेंच गरजू शाळांमध्ये स्थलांतरित
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ म्हणाल्या, एकूण 1407 अतिरिक्त बेंच असून 1007 बेंच गरजू शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. बेळगावसोबत चिकोडीमध्येही हे काम सुरू करण्यात आले आहे.