कामगार खात्याच्या निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
लोकायुक्तांची निपाणीत कारवाई
बेळगाव : बोरगाव (ता. निपाणी) येथील एका कारखान्याला दिलेली कारणे दाखवा नोटीस बंद करण्यासाठी कारखानदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना निपाणी येथील कामगार खात्याच्या निरीक्षकाला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंतराय यांनी सोमवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. इचलकरंजी, ता. हातकणंगला, जि. कोल्हापूर येथील राजू लक्ष्मण पाच्छापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निपाणी येथील कामगार खात्याचे निरीक्षक नागाप्पा यल्लाप्पा कळसण्णावर याला लोकायुक्त पोलिसांनी अटक केली आहे. बोरगाव येथील आर. पी. प्रॉडक्शन या कारखान्याला 10 फेब्रुवारी 2025 रोजी कारणे दाखवा नोटीस कामगार खात्याकडून पाठविण्यात आली होती.
त्याआधी कारखान्याला भेट देऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. पोस्टाने नोटीस पाठवून 16 सप्टेंबर रोजी राजू यांना फोन करून निपाणीला बोलावून घेण्यात आले. याआधी दिलेली शो कॉज नोटीस बंद करून कारवाई टाळण्यासाठी कामगार खात्याच्या निरीक्षकाने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यामुळे राजू पाच्छापुरे यांनी बेळगाव येथील लोकायुक्त पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता. पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भरतरेड्डी एस. आर., पोलीस निरीक्षक वेंकटेश यडहळ्ळी, पोलीस निरीक्षक संगमनाथ होसमनी, रवी मावरकर, एस. एस. पुजार, अभिजित जमखंडी, शशी देवरमनी, बसवराज कोडळ्ळी, बसवराज हुद्दार, लगमण्णा होसमनी, प्रकाश माळी, के. एस. काजगार आदींचा समावेश असलेल्या पथकाने सोमवारी कामगार खात्याच्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे.