महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्रिकेटचा थरार...

06:35 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विश्व करंडक क्रिकेट स्पर्धा आता उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचली असून, उपांत्य सामन्यातील चार संघ जवळपास निश्चित झाले आहेत. गुणतक्त्यात यजमान टीम इंडिया 16 गुणांसह अग्रस्थानी असल्याचे दिसते. त्यामुळे निश्चितच भारताकडून क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, भारतीय संघ तिसऱ्यांदा वन डे विश्वचषकावर नाव कोरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या सामन्यापासून नजरेत भरणारी कामगिरी करणाऱ्या भारताने आत्तापर्यंत मागे वळून पाहिलेले नाही. सामन्यागणिक त्यांचा खेळ उंचावत असल्याचेच पहायला मिळते. रोहित शर्माचा झंझावात हे यंदाच्या विश्वचषकाचे वैशिष्ट्या म्हणता येईल. सलामीवीर आणि कर्णधार या दोन्ही भूमिका तो अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहे.  क्रिकेट जगतात रोहित ‘हीटमॅन’ या नावाने ओळखला जातो. या लौकिकास साजेशी कामगिरी त्याच्या हातून सध्या होत आहे. रोहित पहिल्या काही षटकात ज्या पद्धतीचा खेळ करतो, तो प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढविणारा ठरतो आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात रोहितने नावाजलेल्या खेळाडूंच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढलेली सर्वांनी पाहिली आहेत. रोहितच्या  या आक्रमणाला कशा पद्धतीने सामोरे जायचे, हा आज प्रत्येक संघापुढचाच प्रश्न असेल. उपांत्य सामना हा ‘करो वा मरो’चा असेल. त्यामुळे या सामन्यातही भारताच्या या सेनापतीला आघाडीवर राहून भारतीय संघाची नौका किनाऱ्याला लावावी लागेल. कर्णधार म्हणून त्याने दाखविलेले कौशल्यही महत्त्वपूर्ण ठरावे. प्रत्येक गोलंदाजाचा कसा आणि कधी उपयोग करायचा, हे त्याने दाखवून दिले आहे. रोहितच्या या साऱ्या धडपडीला संघ सहकारीही उत्तम साथ देताना दिसतात. डेंग्यूची लागण झाल्याने काही सामन्यांना मुकावे लागलेला शुभमन गिलही आता स्थिरावला आहे. दुसऱ्या सलामीवीराच्या भूमिकेत तो रोहितला उत्तम साथ देत आहे. पुढच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची आशा असेल. विराट कोहली हे भारताचे खणखणीत नाणे मानले जाते. विराटनेही आपला दर्जा सिद्ध करीत दोन शतकांसह धावांचा रतीब घातला आहे. संयम व आक्रमण अशा दोहोंचा त्याच्या खेळात संगम दिसतो. नियोजीत धावांचा पाठलाग करताना तर त्याचा खेळ अधिकच फुलतो. सध्याचा त्याचा फॉर्म पाहता ही रनमशीन यापुढेही अशीच धडधडत राहील, याचा विश्वास वाटतो. श्रेयस अय्यरने सुऊवातीच्या टप्प्यात काहीशी निराशा केली असली, तरी मागच्या दोन सामन्यात त्याने आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याला कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. के. एल. राहुल हा यष्टीरक्षक व फलंदाज अशा दोन्ही आघाड्यांवर आपले प्रतिभेचे दर्शवन घडवत आहे. त्याने घेतलेले काही झेल अफलातूनच म्हणता येतील. त्याचबरोबर त्याचा फलंदाजीतील चिवटपणाही कौतुकास पात्र ठरतो. आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवनेही मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. काही चेंडूतच रन रेट अस्मानाला नेण्याची क्षमता असणारा सूर्या पुढच्या सामन्यांत तळपला, तर भारताची लढाई सोपी होऊ शकेल. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांनी फिरकीत आपला ठसा उमटविला असून, उपांत्य लढतीत त्यांना आपले जाळे अधिक पक्के करावे लागेल. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज हे भारताचे वेगवान त्रिकूट सध्या आग ओकत आहे. शमीने तर अवघ्या चार सामन्यात 16 बळी घेत प्रतिस्पर्ध्यांच्या नाकी नऊ आणले आहे. शमी हा अचूक टप्पा, वेग, स्विंग यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत धोकादायक गोलंदाज बनलेला दिसतो. शमी नावाचे हे ब्रह्मास्त्र लढाईच्या निर्णायक टप्प्यात संघाकरिता नक्कीच महत्त्वाचे असेल. बुमराहनेही आत्तापर्यंत अचूक गोलंदाजी केली असून, फलंदाजांना जखडून ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. इकॉनॉमी रेटचा विचार करता बुमराह सर्वाधिक प्रभावी गोलंदाज ठरतो. सिराजचा वेग आणि जोशही भारतीय संघासाठी प्रेरक ठरला आहे. पहिल्या स्पेलमध्ये बळी मिळवून प्रतिस्पर्ध्याचे खच्चीकरण करण्याचा आपला बाणा त्याला कायम ठेवावा लागेल. एकूणच यंदाचा भारतीय संघ परिपूर्ण वाटतो. असे असले, तरी गुणतक्त्यातील अन्य संघही तोडीस तोड ठरावेत. भारताखालोखाल दक्षिण अफ्रिकेनेही जोरदार कामगिरी करीत क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. डिकॉक, डुसेन, क्लासेनसह त्यांचे अन्य खेळाडू फॉर्मात असून, आपली चोकर्स ही प्रतिमा पुसण्याच्या ते प्रयत्नात असतील. स्पर्धेच्या प्रारंभी मार खाणाऱ्या ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या या संघाने यंदाही आपली दावेदारी भक्कम केली आहे. तर मागच्या वेळी उपविजेतेपद पटकावणारा न्यूझीलंडचा संघही चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या राचिन रवींद्रने आत्तापर्यंत सर्वाधिक 565 धावा कुटल्या असून, पंचविशीआधी सर्वाधिक धावांचा सचिनचा विक्रमही मागे टाकला आहे. पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहेत. इंग्लंडवर 300 च्या फरकाने विजय मिळविला, तरच त्यांना आपले आव्हान टिकविता येऊ शकेल. सध्याचा पाकचा संघ पाहता हे अशक्यप्राय वाटते. त्या अर्थी उपांत्य सामन्यातील चौथा संघ न्यूझीलंडच असू शकतो आणि त्यांचा सामना टीम इंडियाशीच होऊ शकतो, अशीच चिन्हे आहेत. गुणवान न्यूझीलंडशी दोन हात करताना भारतालाही गाफील राहून चालणार नाही. मागच्या काही दिवसांत खरोखरच क्रिकेटप्रेमींना खूप चांगले क्रिकेट पहायला मिळाले आहे. अफगाणिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचता येणार नसले, तरी या संघाच्या खेळाडूंनी सर्वांचीच मने जिंकली आहेत. पुढच्या निर्णायक लढतींमध्ये तर क्रिकेटचा हा थरार टीपेला पोहोचलेला असेल, यात कोणतीही शंका वाटत नाही. आता भारतीयांची दिवाळी टीम इंडिया गोड करणार का, हेच पहायचे.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article