For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुवैतची भिस्त भारतीयांवर

06:29 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुवैतची भिस्त भारतीयांवर
Advertisement

कुवैतमधील प्रगतीला भारतीय नागरिकांचे बळ, भारतीय अर्थव्यवस्थेलाही मिळतोय ‘बुस्टर डोस’

Advertisement

कुवैतमध्ये नुकत्याच घडलेल्या अग्नितांडवाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. एका इमारतीला लागलेल्या आगीत 50 हून अधिक जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतांपैकी 45 जण मूळचे भारतीय नागरिक होते. याशिवाय 30 भारतीय जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही भीषण आगीची घटना दक्षिण कुवैतमधील मंजाफ शहरात घडली. या दुर्घटनेनंतर कुवैतसह इतर देशांमध्ये कामा-धंद्याच्या निमित्ताने ओढा कसा वाढत चाललाय आणि यानिमित्ताने दोन्ही देशांना त्याचा कितपत लाभ मिळतोय, याचा घेतलेला परामर्ष...

कुवैतची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर परदेशी कामगारांवर अवलंबून आहे. यात भारतीयांची संख्याही मोठी आहे. तेथे राहणारे बहुतांश भारतीय मजूर म्हणून काम करतात. या श्र्रमातून त्यांचे उत्पन्न चांगले आहे. परंतु येथे जीवन जगणे कठीण आहे. अधिक कमाईचे आमिष दाखवून कंत्राटदार आणि मालकांनी अनेक भारतीयांना आकर्षित केले आहे. विदेशातील कामातून अधिक आर्थिक उत्पन्न

Advertisement

प्राप्त होत असल्याने अनेकांना त्याची भुरळही पडते. भारतातून कुवैतमध्ये गेलेले काही लोक सर्वसामान्य मजूर किंवा कामगार म्हणून काम करत असले तरी कित्येकजण उच्च दर्जाची कामेही करतात. त्यातून त्यांना मिळणारी अर्थप्राप्तीही मोठी आहे. अर्थप्राप्तीसोबत राहणीमान, शिक्षण, जेवण-खान आदी सुविधाही योग्यप्रकारे मिळत असल्याने भारतातून जाणारे लोक तेथे रमतात. यातून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना बळकटी मिळते हे सत्य नाकारता येणार नाही.

कुवैत हा देश भारतात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि उच्च पात्र व्यावसायिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा स्रोत मानतात. भारतीय समुदायामध्ये प्रामुख्याने अभियंते, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकौंटंट, शास्त्रज्ञ, सॉफ्टवेअर तज्ञ, व्यवस्थापन व्यावसायिक आणि सल्लागार, वास्तुविशारद, किरकोळ विव्रेते आणि व्यापारी अशा व्यावसायिकांचा समावेश आहे. अलिकडे कुवेतमध्ये उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रातील, विशेषत: सॉफ्टवेअर आणि आर्थिक क्षेत्रातील उच्च पात्र भारतीय तज्ञांची संख्या वाढली आहे. आरोग्याच्या क्षेत्रात भारत केवळ उच्च तज्ञच पुरवत नाही तर उच्च प्रतिष्ठा असलेल्या पॅरामेडिकल स्टाफचा पुरवठा करतो. भारतीयांचाही कुवैतकडे ओढा वाढल्याने भारतात येणाऱ्या विदेशी चलनाचा आलेख चढलेला दिसून येतो.

कुवैतची 70 टक्के लोकसंख्या विदेशी

2023 मध्ये कुवैतची एकूण लोकसंख्या 48.59 लाख होती. कुवैतच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 30 टक्के लोक कुवैतीयन तर 70 टक्के लोक विदेशी आहेत. सध्या तेथे सुमारे 10 लाख भारतीय नागरिक राहत आहेत. त्यापैकी 61 टक्के मजूर आणि कर्मचारी होते. हळूहळू मोठ्या संख्येने परदेशी लोकांना आकर्षित करून कुवैत हा विदेशी-बहुल प्रदेश बनला आहे. मात्र, आर्थिक आव्हानांमुळे तेथे स्थलांतरितविरोधी भावना आता तीव्र होत आहेत. अशा परिस्थितीत कुवैत सरकारने लोकसंख्येतील परदेशी लोकांची संख्या 70 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नजीकच्या काळात याचा फटका भारतीय कामगारांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय कामगार : कुवैतमधील भारतीय समुदायामध्ये राहणारे लोक हे प्रवासी भारतीय आणि भारतीय वंशाचे आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या मते 2020 पर्यंत कुवैतमधील भारतीयांचा आकडा अंदाजे 10,20,000 इतका होता. यापैकी बहुतेक केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या दक्षिण भारतीय राज्यांमधून आलेल्यांची संख्या जवळपास जवळपास 70 टक्के आहे. कुवैतमधील 21 टक्के लोकसंख्या भारतीय असून 30 टक्के कामगार भारतीय आहेत. हे लोक ड्रायव्हर, सुतार, गवंडी, घरगुती कामगार, अन्न वितरण आणि कुरिअर डिलिव्हरी आदी कामे करतात. पण कुवैतमध्ये भारतीय फक्त मजूर म्हणून काम करतात असे नाही. भारतीय दुतावासानुसार, कुवैतमध्ये एक हजाराहून अधिक भारतीय डॉक्टर आहेत. 500 दंतवैद्य भारतीय असून 24 हजारांहून अधिक परिचारिका भारतीय आहेत. तसेच अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांचा आकडाही प्रचंड आहे. आकडेवारीनुसार कुवैतमध्ये 5.09 लाख लोक सरकारी क्षेत्रात आणि 16.38 लाख लोक खासगी क्षेत्रात काम करतात. सरकारी क्षेत्रात साडेचार टक्के भारतीय आहेत. तर खासगी क्षेत्रात 30 टक्के भारतीय आहेत. 10 लाख भारतीयांपैकी 8.85 लाखांहून अधिक भारतीय तेथे मजूर म्हणून काम करतात. भारतीयांनंतर कुवेतमध्ये इजिप्शियन कामगारांची संख्या मोठी आहे. तेथे 4.77 लाख इजिप्शियन कामगार वास्तव्यास आहेत.

कमाई जास्त : कुवैतमध्ये भारताच्या तुलनेत कमाई जास्त असल्यामुळे बहुतांश लोक आखाती देशांमध्ये कामासाठी जातात. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन रेग्युलेशनच्या नियमानुसार परदेशात काम करणाऱ्या भारतीय कामगारांसाठी किमान रेफरल वेतन निश्चित करण्यात आले आहे. भारताने कुवैतमध्ये 64 प्रकारच्या कामांसाठी 300 ते 1,050 डॉलरदरम्यान काम करणाऱ्या मजुरांचा मासिक पगार निश्चित केला होता.

शैक्षणिक सुविधा : कुवैतमध्ये 18 भारतीय शाळा असून त्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न आहेत. यापूर्वी 164 भारतीय समुदाय संघटना कुवैतमधील भारतीय दुतावासात नोंदणीकृत होत्या. पुनर्नोंदणीची आवश्यकता सुरू झाल्यापासून यापैकी 106 भारतीय समुदाय संघटनांनी पुन्हा एकदा दुतावासाकडे नोंदणी केली असून नोंदणीकृत संघटनांची संख्या वाढत आहे.

कामगारांचे जीवनमान : भारतीय कामगारांना अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागतो. भारतीय कामगार अपार्टमेंटमधील लहान खोल्यांमध्ये किंवा लेबर पॅपमध्ये राहतात. प्रत्येक खोलीत 10 ते 15 मजूर राहतात. याशिवाय भारतीय मजुरांना निर्धारित वेळेपेक्षा जास्त तास काम करायला लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अनेकवेळा वाद होऊन कामगारांचे पगारही थांबल्याचे दिसून येते. यासोबतच छेडछाडीच्या अनेक तक्रारी आहेत.

कुवैतला पसंती का?

कित्येक भारतीय कामधंद्यासाठी कुवैतला प्राधान्य देतात. यामागे अनेक कारणे सांगितली जातात. येथे काम करणे सोपे असून जास्त कौशल्य आवश्यक नाही. तसेच कमाईदेखील जास्त आहे. येथे कोणालाही आठवड्यातून 48 तासांपेक्षा जास्त काम दिले जात नाही. कोणत्याही दिवशी जास्त काम झाले तरी ओव्हरटाईम मिळतो. तथापि, ओव्हरटाईमदेखील दोन तासांपेक्षा जास्त असू शकत नाही.

रिसर्च फर्म वर्कयार्डच्या अहवालानुसार, कुवैत हे जगातील सर्वात स्वस्त ठिकाणांपैकी एक आहे. येथे राहणे, खाणे-पिणे सर्व काही स्वस्त आहे. येथे एक बेडरुमचा फ्लॅट 250 ते 300 दिनार इतक्या भाडेदराने उपलब्ध आहे. त्याचवेळी दोन बेडरुमच्या फ्लॅटचे भाडे दरमहा 300 ते 400 दिनार दरम्यान आहे. बॅचलर्सना येथे 75 ते 100 दिनार मासिक भाड्याने खोली मिळते. साधारणपणे कुवैतमध्ये एका व्यक्तीसाठी महिनाभरासाठी जेवणाची किंमत फक्त 50 ते 75 दिनार असते. एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीचा मासिक पगार 600 दिनारपेक्षा जास्त असेल तर तो कारही खरेदी करू शकतो. वाहनांच्या किमतीही सर्वसामान्य कामगारांच्या आवाक्यात आहेत.

भारतीयांसाठी नोकरी-व्यवसायातील सुविधा...

कुवैतमध्ये कामगारांना दरवषी 30 दिवसांची रजा अनिवार्य आहे. या 30 सुट्या वापरल्या नाहीत तर कंपनी किंवा कंत्राटदार जादा पैसे देतात. काम करत असताना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाल्यास प्रवासी भारतीय विमा योजनेंतर्गत 75 हजार ऊपयांची आर्थिक मदत मिळते.

आजारी पडल्यास अतिरिक्त 15 दिवसांची रजा मिळू शकते. या कालावधीत कोणतेही पैसे कापले जात नाहीत. वैद्यकीय रजा 15 दिवसांपेक्षा जास्त झाल्यास पगाराच्या तीन चतुर्थांश रक्कम मिळते. दर आठवड्याला एक दिवस सुट्टी मिळते.

वेळप्रसंगी साप्ताहिक सुटीदिवशी काम केल्यास कंपनी किंवा कंत्राटदार किमान वेतनाच्या 50 टक्के अधिक रक्कम अदा करतो. आठवड्यातून 48 तासांपेक्षा जास्त काम झाल्यास कंत्राटदार किंवा कंपनीला ओव्हरटाईम द्यावा लागतो. हा ओव्हरटाईम मूळ वेतनापेक्षा 25 टक्के जास्त मिळतो.

30 वर्षांखालील भारतीय महिला घरगुती मदतनीस म्हणून काम करू शकत नाहीत. भारत सरकारने ही बंदी घातली आहे. एवढेच नाही तर घरगुती मदतनीस वगळता इतर कामात गुंतलेल्या महिलांना रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत काम करायला लावता येणार नाही.

भारतातून परदेशात काम करणाऱ्यांनाही विमा संरक्षण मिळते. परदेशात काम करत असताना अचानक मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 10 लाख ऊपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. कोणत्याही वादाच्या घटनेत सरकार 30,000 ऊपयांपर्यंतचा कायदेशीर खर्च देखील उचलते.

संकलन् - जयनारायण गवस

Advertisement
Tags :

.