राज्य सहकारी बँकेवर कुर्टीकर गटाची बाजी
13 पैकी 12 उमेदवार विजयी: माजीमंत्री प्रकाश वेळीप पराभूत
प्रतिनिधी/ फोंडा
राज्यातील सहकारी बँक क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या गोवा राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीत पांडुरंग कुर्टीकर यांच्या समर्थक गटाने बाजी मारली असून त्यांचे 13 पैकी 12 उमेदवार विजयी झाले आहेत. माजी सहकारमंत्री प्रकाश वेळीप यांना पराभवाचा धक्का बसला. तसेच थ्रिफ्ट को. ऑप. असोसिएशनवरून पांडुरंग कुर्टीकर यांच्यासह तीन उमेदवार निवडून आले आहेत. बँकेच्या संचालक मंडळावर सहकार क्षेत्राशी निगडीत विविध प्रकारच्या नऊ संस्थांवऊन प्रतिनिधी निवडले जातात. गोवा राज्य सहकारी बँकेच्या 13 संचालक मंडळाच्या जागांसाठी रविवारी निवडणूक झाली होती. काल मंगळवारी सकाळी कुर्टी फोंडा येथील सहकार भवनमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.
व्ही. के. एस (सेवा सोसायटी) विभागातील तीन जागांवर विनायक नार्वेकर (42 मते), विठ्ठलदास वेर्णेकर (42) व कृष्णा कुडणेकर (39) हे तिघे उमेदवार विजयी झाले असून उपासो गावकर (20) हे पराभूत झाले. कंझ्युमर्स (ग्राहक) विभागातील एका जागेवर श्रीकांत नाईक (16) हे विजयी झाले तर प्रकाश वेळीप (6) यांचा पराभव झाला. अदर्स विभागातील एका जागेवर दादी नाईक (57) हे विजयी झाले असून वासुदेव परब (51) यांचा पराभव झाला. डेअरी विभागातील एका जागेसाठी विजयकांत गावकर (33) हे विजयी झाले असून विकास प्रभू (23) व रमेश इदाथडन (29) हे पराभूत झाले. सॅलरी अर्नर विभागातील दोन जागांसाठी उत्तर गोव्यातून प्रिया टांगसाळे (41) या विजयी झाल्या तर रामा चोर्लेकर (35) हे पराभूत झाले. दक्षिण गोव्यातून शाबा सावंत देसाई (37) हे विजयी तर संजय देसाई (27) हे पराभूत झाले. इंडिव्हीज्युल (वैयक्तिक) विभागातून पांडुरंग कुर्टीकर (1202) हे विजयी झाले असून चंद्रशेखर कैसूर (152) हे पराभूत झाले आहेत. अर्बन विभागातून श्रीपाद परब, महिला विभागातील दोन जागांवर चित्रा वायंगणकर व मैथिली परब तर एसटी एससी विभागातून प्रभाकर गावकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
दोन महिलांसह चार उमेदवार बिनविरोध
या निवडणुकीत पांडुरंग कुर्टीकर यांच्या समर्थक गटातील 13 पैकी 12 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापैकी महिला विभागातून चित्रा वायंगणकर व मैथिली परब, अर्बन विभागातून श्रीपाद परब तर एससीएसटी विभागातून प्रभाकर गावकर हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पांडुरंग कुर्टीकर यांना विक्रमी अशी 1,202 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी चंद्रशेखर कैसूर यांना केवळ 152 मते मिळाली आहेत.
माजीमंत्री प्रकाश वेळीप पराभूत
माजी सहकारमंत्री व आदर्श कृषी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कंझ्युमर्स म्हणजेच ग्राहक संस्था विभागातून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष श्रीकांत नाईक यांनी दहा मतांच्या मोठ्या फरकाने वेळीप यांचा पराभव केला. श्रीकांत नाईक यांना 16 तर प्रकाश वेळीप यांना 6 मते मिळाली. पगारांची शिखर संस्था असलेल्या थ्रिफ्ट को. ऑप. असोसिएशनचे अध्यक्ष असलेले पांडुरंग कुर्टीकर यांच्यासह उपाध्यक्ष शाबा सावंत देसाई व संचालक प्रिया टांगसाळे हे तीन उमेदवार राज्य सहकारी बँकेवर निवडून आले आहेत.