कुपवाड एमआयडीसीत चाकण सबस्टेशन ! होणार आता १० मेगा व्होल्ट अँम्पिअरचे
उद्योजकांच्या बैठकीत उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची सबस्टेशनला तत्वता मंजुरी
कुपवाड प्रतिनिधी
कुपवाड एमआयडीसीत आता चाकण सबस्टेशन १० मेगा व्होल्ट अँम्पिअरचे होणार आहे. उद्योजकांच्या बैठकीत उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबस्टेशनला तत्वता मंजुरी दिली असल्याची माहिती कृष्णाव्हॅली चेंबरच्या वतीने देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या समस्येबाबत बैठक बोलावली होती. बैठकीस कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक रमेश आरवाडे उपस्थित होते.
बैठकीत आरवाडे म्हणाले, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये विजेअभावी जुन्या उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविणे कठीण झालेले आहे, तसेच जे नवीन उद्योजक आहेत त्यांना विजेअभावी आपला व्यवसाय सुरू करता येत नाही. सदर विषयावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली व पूर्वी चाकण सबस्टेशनमधून 5 एमव्हीए एवढा पुरवठा होत होता.
आता 5 एमव्हीएच्या ऐवजी आता तेथे १० एमव्हीए ३३/११ केव्हीचे सबस्टेशन होणार आहे. सदर सबस्टेशन कामासाठी १६७.९५ लाख एवढा निधी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला आहे. सदरच्या वाढीव सबस्टेशनला मंजुरी दिली आहे, त्याबद्दल औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रस्तावित 33/ 11 केव्हीचे सबस्टेशन येत्या 2 महिन्यात कार्यान्वित होईल, असे त्यांनी सांगितले.
सदरचे सबस्टेशन 2 महिन्यात करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. सदरचे 33/ 11 केव्ही सबस्टेशन झाले तर परिसरातील उद्योजकांना विजेचा जास्तीत जास्त पुरवठा होईल. विजेअभावी जे उद्योग रखडलेले आहेत, त्यांचाही प्रश्न मार्गी लागेल. सदरच्या सबस्टेशन काम मार्गी लावण्यात महावितरणचे अधिक्षक अभियंता धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर, तसेच प्रदीप वाकोडकर यांचे योगदान लाभले, त्यांचे आभार मानण्यात आले.