कुप्पटगिरी प्राथमिक शाळेचे पत्रे उडून गेल्याने नुकसान
रविवार असल्याने मोठा अनर्थ टळला : दोन दिवसांत पत्रे बसविण्याचे आश्वासन
खानापूर : शहराजवळील कुप्पटगिरी येथील मराठी प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्यांवरील जोरदार वाऱ्यामुळे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.सोमवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह बीआरसी, सीआरसी आणि माध्यान्ह योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. येत्या दोन दिवसात पुन्हा पत्रे बसविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन गट शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. रविवार दि. 6 रोजी दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. यातच सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार आणि सोसाट्याचे वारे सुरू झाले होते. त्याचदरम्यान कुप्पटगिरी येथील मराठी प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्यांवरील पत्रे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून संपूर्ण छत उडून शेजारील शेतात पडले आहे.
रविवार असल्याने शाळेला सुटी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याबाबतची माहिती शाळा सुधारणा कमिटीने गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिली होती. सोमवारी सकाळी गट शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा, माध्यान्ह आहार योजना अधिकारी एस. एस. कित्तूर, बीआरसी नायक तसेच शंकर कम्मार यांनी शाळेत भेट देवून पाहणी केली. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष गणपती मुतगेकर, गजानन पाटील, शंकर पाटील, विश्वनाथ बुवाजी यासह संपूर्ण एसडीएमसी कमिटीचे सदस्य व पालक उपस्थित होते. एसडीएमसी सदस्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने पत्रे पुन्हा बसविण्यात यावेत, अशी मागणी केली. गटशिक्षणाधिकारी रामाप्पा यांनी ग्रा. पं. विकास अधिकारी तसेच जि. पं. अधिकाऱ्यांशी संपर्क साधून येत्या दोन दिवसात पत्रे बसविण्याचे काम हाती घेण्यात यावेत, अशा सूचना केल्या आहेत.