सरकारी शाळेतील साहित्याची नासधूस
समाजकंटकांना समज देण्याची पोलिसांकडे मागणी
बेळगाव : कणबर्गी येथील सरकारी मराठी शाळेत समाजकंटकांकडून साहित्याची नासधूस करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. शाळेतील फरशी, जीना, पाईप, प्रवेशद्वारावरील जाळी यांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच वर्गाबाहेरील सूचना फलकावर रंग फासण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शाळेच्यावतीने माळमारुती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. समाजकंटकांकडून सरकारी शाळांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातही मराठी शाळांच्या साहित्याची नासधूस करण्याच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरापूर्वी वडगाव येथील 31 नं. शाळेत माथेफिरूंकडून इलेक्ट्रीक साहित्याचे नुकसान करण्यात आले होते.
त्यापाठोपाठ आता कणबर्गी येथील शाळेतील साहित्याचे नुकसान करण्यात आले आहे. शाळेच्या व्हरांड्यातील फरशी फोडण्यात आली आहे तर जिन्यासाठी घालण्यात आलेल्या काँक्रीटच्या पडदीचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच उंदीर अथवा इतर प्राणी शाळेमध्ये शिरू नयेत यासाठी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली लोखंडी जाळी तोडण्यात आली आहे. शाळेमध्ये संगणक, प्रोजेक्टर यासह इतर किमती सामान असल्याने संबंधितांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी शाळेच्यावतीने माळमारुती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी शाळेच्या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी व असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.