भू-रुपांतरणाच्या विरोधात कुंकळ्यो गाव एकवटला
निसर्गसौंदर्यावर घाला घालणारा प्रकल्प नकोच : गावची चांगली ओळख पुसून वाढविणार समस्या
फोंडा : प्रियोळ पंचायतक्षेत्रातील कुंकळ्यो गावात एका बिल्डरकडून भूखंड पाडण्यासाठी सुरू असलेल्या जमीन ऊपांतरास तसेच भूखंड विक्रीस ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. गावातील निसर्गसौंदर्यावर घाला घालून शांततेत बाधा आणणाऱ्या प्रकल्पाला सरकारने परवानगी देऊ नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. काल रविवारी सकाळी येथील केळबाय मंदिरात मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पाला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार केला. वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्यो पंचायतीच्या सरपंच हर्षा गावडे, व्हीपीके अर्बनचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, बागायतदार व दूधउत्पादक संजीव कुंकळ्योकर, शिवदास नाईक, मधुकर गावडे, पंचसदस्य रंगनाथ गावडे व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावची ओळखच होणार नष्ट
कुंकळ्यो गाव हे कृषी व बागायतीवर अवलंबून आहे. बरीच कुटुंबे आजही बागायतीवर आपला उदरनिर्वाह चालवितात. कुंकळ्यो गावाची हीच खरी ओळख आहे. भूखंड पाडण्यासाठी जी जमीन खरेदी करण्यात आली आहे, त्यापैकी बहुतांश जागा ही बागायती आहे. ही जमीन ऊपांतरीत करणे म्हणजे गावच्या अस्तित्त्वावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावात अगोदरच पाणी, वीज समस्या
गावात आधीच वीज व पाण्याची समस्या आहे. रहिवासी प्रकल्पामुळे साहजिकच लोकसंख्या वाढणार असून गावातील या सुविधांवर मर्यादा येतील, अशी भितीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आधीच कुंकळ्यो गावचे क्षेत्रफळ मर्यादित असून बहुतांशी भाग बागायतीने व्यापलेला आहे. गावातील जमिनीचे अशा प्रकारे मोठ्या रहिवासी प्रकल्पांसाठी ऊपांतर झाल्यास विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
एकूण 99 हजार चौ. मी. जमीन
कुंकळ्यो गावातील श्रीगोमंतक तिऊपती बालाजी मंदिरापासून काही अंतरावर असलेली 99 हजार चौ. मी. जमीन एका बिल्डरला विकण्यात आली आहे. या जमिनीत भूखंड पाडून ते विकण्याच्या तयारीत असल्याचा सुगावा लागताच स्थानिकांनी गेल्या रविवारी गावात सभा बोलावून या प्रकाराला विरोध सुरू केला आहे.
भूखंड खरेदी करणाऱ्यांना ग्राम पंचायतीचा इशारा
जमीन ऊपांतर व भूखंड विक्रीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध असतानाही, जर कुणी येथील भूखंड विकत घेण्याच्या तयारीत असतील, तर त्यांनी आपला विचार बदलावा. स्वत:च्या जबाबदारीवर भूखंड खरेदीसाठी पैसे गुंतवावेत असा थेट इशारा देणारा फलक कुंकळ्यो गावच्या सीमेवर लावण्यात आला आहे. पंचायत गावचा एकोपा व शांततेला प्राधान्य देत असून भूखंड पाडून ते विक्री करण्यास पंचायतीचा विरोध आहे. पंचायतीने त्यासाठी कुठलीच परवानगी दिलेली नाही. पंचायत ग्रामस्थांच्या बाजूने आहे, असे सरपंच हर्षा गावडे यांनी स्पष्ट केले.