For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन

06:01 AM Mar 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन
Advertisement

मद्रास उच्च न्यायालयाकडून दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कुणाल कामरा याला अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी त्याला विल्लुपुरम जिल्ह्यातील वानूर येथील न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर जामीनपत्र भरण्यास सांगितले. तसेच न्यायालयाने खार पोलिसांना नोटीस बजावत या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी निश्चित केली. कुणाल कामरा याने मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याने न्यायालयात केलेल्या याचिकेत आपण तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे स्पष्ट करतानाच जर मी मुंबईत परत आलो तर मुंबई पोलीस मला अटक करतील, अशी भीती व्यक्त केली होती. तसेच आपल्या जीवाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचेही त्याने याचिकेत म्हटले होते.

Advertisement

36 वर्षीय स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर टीका केली होती. आपल्या विडंबनामध्ये त्याने शिंदे यांना देशद्रोही म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कामरा याला दोनवेळा समन्स बजावले होते. त्यांना 31 मार्च रोजी पोलीस स्थानकात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याचदरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेने गुरुवारी त्याच्याविरुद्ध विशेषाधिकार उल्लंघनाचा प्रस्तावही मंजूर केला.

कामरा याने आपल्या गाण्याद्वारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडण्यावर विनोदी भाष्य केले होते. यासंबंधीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर 23 मार्चच्या रात्री शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. दरम्यान, कुणाल कामरा याने शिंदेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.