For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुलदीप यादवचा पंच, टीम इंडियाने विंडीजला दिला फॉलोऑन

06:58 AM Oct 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
कुलदीप यादवचा पंच   टीम इंडियाने विंडीजला दिला फॉलोऑन
Advertisement

विंडीजचा संघ अद्यापही 97 धावांनी मागे : शाय होप, जॉन कॅम्पबेलची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावात फलंदाजीत आपली धमक दाखवून दिली. अरुण जेटली स्टेडियमवर शाय होप आणि जॉन कॅम्पबेलच्या फलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या दिवसातील अखेरचे सत्र वेस्ट इंडिजने आपल्या नावे केले. दिवसअखेरीस विंडीजने 49 षटकांत 2 गडी गमावत 173 धावा केल्या असून ते अद्याप 97 धावांनी पिछाडीवर आहेत. तत्पूर्वी, पाहुण्या विंडीजचा पहिला डाव 248 धावांत आटोपला. कुलदीप यादवने पाच बळी घेण्याची किमया केली.

Advertisement

कुलदीपचे पाच बळी

प्रारंभी, तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजने 4 बाद 140 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पण कुलदीप यादवच्या फिरकीत ते फसले. कुलदीपने स्टार फलंदाज शाय होपला बोल्ड करत पाहुण्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर टेविन इमलाचला एल्बीडब्ल्यू आणि मग जस्टिन ग्रेव्हजलाही त्याने तंबूचा रस्ता दाखवला. मोहम्मद सिराजने जोमेल वॉरिकनला बोल्ड करत विंडीजचा आठवा गडी बाद केला. मात्र, पियरे आणि अँडरसन फिलिप यांनी नवव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली. यामुळे विंडीज संघाला दोनशेचा टप्पा तरी गाठता आला. लंचनंतर मात्र जसप्रीत बुमराहने पियरेला (23 धावा) बोल्ड करत ती जोडी फोडली. शेवटची विकेट मिळवण्यासाठी भारताला थोडा संघर्ष करावा लागला. फिलिप आणि जायडन सील्स यांनी 27 धावा जोडल्या. शेवटी कुलदीपने सील्सला बाद करून विंडीजच डाव 248 धावांत गुंडाळला आणि फॉलोऑन करण्यास भाग पाडले. भारतीय संघाला 270 धावांची भक्कम आघाडी मिळाली. कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करताना सर्वाधिक 5 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले.

फॉलोऑननंतर विंडीजची आश्वासक सुरुवात

फॉलोऑन मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजने चिवटपणे प्रतिकार करत पिछाडी भरून काढली. जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने 49 षटकांत 2 गडी गमावत 173 धावा केल्या होत्या. कॅम्पबेल 87 तर होप 66 धावांवर खेळत आहेत. वेस्ट इंडिजचा संघ अजूनही 97 धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय संघाने फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावात खेळतानाही विंडीजची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने चंद्रपॉलला अवघ्या 10 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अलिक अथनाझेलाही वॉशिंग्टन सुंदरने 7 धावांवर माघारी धाडले. 35 धावांवर वेस्ट इंडिज संघाने पहिल्या दोन विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर शाय होप आणि जॉन कॅम्पबेल या जोडीने डाव सावरला. दोघांनीही दिवसअखेरपर्यंत भारतीय गोलंदाजांचा सामना करताना अर्धशतके झळकावली. कॅम्पबेलने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 145 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारासह 87 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याला होपने चांगली साथ देताना 103 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारासह 66 धावा केल्या आहेत. दरम्यान, वेस्ट इंडिजचा संघ अजूनही 97 धावांनी पिछाडीवर आहे. ही जोडी फोडून चौथ्या दिवशी टीम इंडिया विजयाचा डाव साधणार की, सामन्यात नवा ट्विस्ट येणार ते पाहण्याजोगे असेल.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 5 बाद 518 घोषित

वेस्ट इंडिज पहिला डाव 81.5 षटकांत सर्वबाद 248 (तेगनारायण चंद्रपॉल 34, अॅथनेझ 41, शाय होप 36, पियरी 23, अँडरसन फिलीप नाबाद 24, सील्स 13, कुलदीप यादव 82 धावांत 5,, जडेजा 3 बळी, बुमराह आणि सिराज प्रत्येकी 1 बळी) वेस्ट इंडिज दुसरा डाव 49 षटकांत 2 बाद 173 (जॉन कॅम्पबेल नाबाद 87, अॅथनेझ 7, चंद्रपॉल 10, शाय होप नाबाद 66, सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी 1 बळी).

 

टीम इंडियाचा ‘चायनामन’ ठरला जगात भारी

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवून देताना पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत धाडत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. कुलदीपने वेस्ट इंडिज विरुद्ध 5 विकेट्स घेण्याची किमया केली. विशेष म्हणजे, कसोटी कारकिर्दीत पाचव्यांदा त्याने हा पराक्रम करून दाखवला आहे. एवढेच नाही तर सर्वात कमी डावात 5 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा मोठा पराक्रम त्याने करून दाखवला आहे. क्रिकेट जगतात कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूने केलेली ही सर्वात जलद कामगिरी ठरली आहे.  कुलदीपने इंग्लंडचा दिग्गज जॉनी वॉर्डल यांना मागे टाकले आहे. वॉर्डल यांनी 5 वेळा ‘पंजा‘ मारण्यासाठी 28 सामने खेळले होते. तर कुलदीपने फक्त 15 व्या सामन्यात पाचव्यांदा ‘पंजा‘ मारत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.

Advertisement
Tags :

.