कुलदीप बिश्नोई यांचा भाजपमध्ये प्रवेश
हरियाणात भाजपचे वाढणार बळ : काँग्रेसला ठोकला होता रामराम
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
हरियाणात 4 वेळा आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिश्नोई यांची पत्नी आणि माजी आमदार रेणुका बिश्नोई यांनीही सत्तारुढ पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.
नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, पक्ष महासचिव अरुण सिंह, राज्यसभा खासदार अनिल बलूनी आणि प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्या उपस्थितीत बिश्नोई दांपत्याने भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. बिश्नोई यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून होतो. राज्यसभा निवडणुकीत बिश्नोई यांनी भाजपला सहकार्य केले आहे. कुठल्याही अटीशिवाय बिश्नोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे.
बिश्नोई हे यापूर्वी काँगेस पक्षाचे आमदार होते. चालू वर्षाच्या प्रारंभी हरियाणा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्त करण्यात न आल्याने ते नाराज झाले हेते. जून महिन्यात राज्यसभा निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याने काँग्रेसने बिश्नोई यांना पक्षातील सर्व पदांवरून हटविले होते. हरियाणाच्या हिसार जिल्हय़ातील आदमपूर मतदारसंघाचे आमदार असलेल्या बिश्नोई यांनी बुधवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत भजनलाल यांचे कनिष्ठ पुत्र असलेल्या कुलदीप बिश्नोई यांनी दुसऱयांदा काँग्रेसला रामराम ठोकला आहे. 2005 मध्ये राज्यात काँग्रेसच्या विजयानंतर भूपेंद्र सिंह हुड्डा यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याने बिश्नोई आणि त्यांचे पिता भजनलाल यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 2007 मध्ये त्यांनी हरियाणा जनहित काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. 2014 ची लोकसभा निवडणुकीत हरियाणा जनहित काँग्रेस आणि काँगेसने आघाडी करत लढविली होती. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी संपुष्टात आली होती. पुढील काळात बिश्नोई यांनी स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता.