कुजुरचे तिसरे तर ज्योतीचे दुसरे सुवर्णपदक
प्रवीण चित्रावेल, नंदिनी, तरणवीर बैन्स सुवर्णपदकाचे मानकरी, अनिमेश कुजुर : तिसरे सुवर्ण
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मंगळवारी ओडीशाचा 21 वर्षीय धावपटू अनिमेश कुजुरने पुरुषांच्या तर महिलांच्या विभागात ज्योती याराजीने 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदके मिळविली. कुजुरचे या स्पर्धेतील तिसरे तर ज्योतीचे दुसरे सुवर्णपदक आहे. या क्रीडा महोत्सवात आणखी एक नवा विक्रम नोंदविला गेला. महिलांच्या 10 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सर्व म्हणजे 9 धावपटूंनी राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
पुरुषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत ओडीशाच्या अनिमेश कुजुरने 20.58 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. कुजुरने या स्पर्धेत यापूर्वी पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत तसेच पुरुषांच्या 4×100 मी. रिलेमध्ये सुवर्णपदके मिळविली आहेत. 200 मी. धावण्याच्या शर्यतीत कुजुरला मात्र यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडताना आला नाही. आसामच्या अमलान बोर्गोहेनने 2022 साली गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात 20.55 सेकंदांचा नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम अद्याप अबाधित राहिला आहे. या क्रीडा प्रकारात तामिळनाडूच्या रागुलकुमारने रौप्य तर बी. नितीनने कांस्य पदक घेतले.
महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत तामिळनाडूच्या ज्योती याराजीने 23.35 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. 25 वर्षीय ज्योतीने या स्पर्धेत रविवारी महिलांच्या 100 मी. हर्डल्समध्ये सुवर्णपदक मिळविले होते. तिने आतापर्यंत या स्पर्धेत 2 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत कर्नाटकाच्या उन्नती अय्यप्पाने 23.70 सेकंदांचा अवधी घेत रौप्य पदक तर तेलंगणाच्या नित्या गंधेने 23.76 सेकंदाचा अवधी घेत कांस्य पदक मिळविले.
महिलांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत दिल्लीच्या केएम चंद्राने 2 मिनिटे 82 सेकंदांचा अवधी घेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत चंद्राने यापूर्वी 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळविले आहे.
पुरुषांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत सेनादलाच्या मोहम्मद अफसलने 1 मिनिट 49.13 सेकंदांचा अवधी घेत सुवर्ण, उत्तराखंडच्या अनु कुमारने 1 मिनिट 49.19 सेकंदांचा अवधी घेत रौप्य तर सेना दलाच्या प्रकाश गडदेने 1 मिनिट 49.58 सेकंदांचा अवधी घेत कास्य पदक मिळविले. पुरुषांच्या हातोडा फेकमधील सुवर्णपदक सेनादलाच्या तरणवीरसिंग बैन्सने पटकाविताना 66.64 मी.ची नोंद केली. या क्रीडा प्रकारात पंजाबच्या दमनित सिंगने रौप्य आणि राजस्थानच्या प्रवीणकुमारने कास्यपदक घेतले.
पुरुषांच्या तिहेरी उडीतील सुवर्णपदक तामिळनाडूच्या प्रवीण चित्रावेलने पटकाविताना 16.50 मी.चे अंतर नोंदविले. तामिळनाडूच्या मोहम्मद सलाउद्दीनने रौप्य आणि केरळच्या मोहम्मद मुहासीनने कांस्यपदक घेतले. महिलांच्या हेप्थेलॉनमध्ये तेलंगणाच्या नंदिनी अगसाराने सुवर्णपदक मिळविताना 5601 गुण नोंदविले. हरियाणाच्या पुजाने 4999 गुणांसह रौप्य आणि तामिळनाडूच्या दिपीकाने 4939 गुणांसह कांस्यपदक घेतले.
नवा राष्ट्रीय विक्रम
मंगळवारी सकाळच्या सत्रात महिलांची 10 कि.मी. चालण्याची शर्यत आयोजित केली होती. या शर्यतीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या विविध राज्यांच्या 9 धावपटूंनी नवा राष्ट्रीय विक्रम करण्याचा पराक्रम केला. या क्रीडा प्रकारातील हा एक नवा विक्रम म्हणावा लागेल. या महिला धावपटूंनी या क्रीडा प्रकारात गेली 26 वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. या क्रीडा प्रकारात हरियाणाच्या रवीनाने 45.52 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविताना 1999 साली मणिपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बालादेवीने नोंदविलेला 51.56 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. उत्तराखंडच्या शालिनीने या क्रीडा प्रकारात रौप्य पदक तर उत्तरप्रदेशच्या मुनीता प्रजापतीने कांस्यपदक मिळविले.
पुरुषांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सेनादलाच्या सर्विन सेबेस्टियनने 1 तास 21.23 असा कालावधी नोंदवित सुवर्णपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात प्रियांका गोस्वामीने रौप्य तर पंजाबच्या अमनज्योत सिंगने कास्यपदक घेतले.